रावेर तालुक्यातील उदळी बुद्रुक शिवारातील घटना
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील उदळी बुद्रुक येथील शिवारात नदीच्या रस्त्याजवळ एका संशयित आरोपीने त्याच्या कारने २ तरुणांना चिरडून ठार मारण्याचा गंभीर प्रयत्न केला. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव सुरेश पाटील (वय २०) आणि त्याचा भाऊ कुणाल सुरेश पाटील (दोन्ही रा. उदळी बुद्रुक ता. रावेर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. कुणाल पाटील याचे संशयित आरोपी गोपी उर्फ सुशील सुभाष पाटील (रा. उदळी बुद्रुक ता. रावेर) यांच्या पुतणीसोबत प्रेमसंबंध होते.(केसीएन)याचा संशयित आरोपी गोपी उर्फ सुशील पाटील याला अनेक दिवसांपासून मनात राग होता. मंगळवारी दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गौरव पाटील व कुणाल पाटील हे भाऊ दुचाकी (क्रमांक एमएच १९ डीसी ४१९१) वरून शेतात फवारणीसाठी फवारणीचा पंप घेऊन निघाले होते.
उदळी गावातून नदीच्या रस्त्याने शेताकडे जात असताना गोपी उर्फ सुशील पाटील याने त्याची कार भरधाव वेगाने चालवत गौरव पाटील व कुणाल पाटील यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने समोरून धडक देऊन जखमी केले. तसेच पुन्हा जोरात कार रिव्हर्स आणून दोघांना चिरडण्याचा प्रयत्न केला. यात दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला गौरव सुरेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गोपी उर्फ सुशील सुभाष पाटील याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राहुल सानप हे तपास करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.









