जळगाव ( प्रतिनिधी ) – नवीन संकल्पनांचा वापर, ग्राहकांना उच्चदर्जाची सेवा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वीजहानी कमी करण्याचे यशस्वी प्रयत्न या निकषांवर ‘बेस्ट स्टेट युटीलिटी’ पुरस्काराकरिता प्रथम तर ‘गुणवत्ता सुधार’ वर्गवारीत महावितरणची तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
१५ व्या इंडिया एनर्जी समिटमध्ये देशभरातील २९ वीज वितरण कंपन्यांमधून विविध निकषांच्या आधारे हे पुरस्कार देण्यात आले. ऑनलाईन कार्यक्रमात काल महावितरणच्या वतीने संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
इंडियन चेबर ऑफ कॉमर्सच्यावतीने आयोजित या परिषदेत भारताचे माजी मुख्य ऊर्जा सचिव अनिल राजदान यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुरस्काराची निवड केली. राज्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता महावितरण कठीण परिस्थितीतही चांगले काम करत असल्याचे गौरवोद्गार अनिल राजदान यांनी काढले.
महावितरणला हा सन्मान म्हणजे अधिकारी-कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नाचे फलित आहे. गुणात्मक वाढ करण्याचा मानस यावेळी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या पुरस्कारकाच्या निमित्ताने व्यक्त केला. येत्या काही वर्षात महावितरणकडून स्मार्ट मीटरचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.