अमळनेर तालुक्यातील बोरी नदीपात्रातील घटना
अमळनेर(प्रतिनिधी) – बोरी नदीपात्रात म्हशीला शोधण्यासाठी गेलेल्या शेतकर्याचा पुरात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तामसवाडी येथील बोरी नदीवरच्या धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे. बोरी नदीला अचानकपणे आलेल्या पुरात पारोळा तालुक्यातील भिलाली येथील कमलाकर हिंमत पाटील या शेतकर्याची म्हैस सापडली. आपल्या म्हशीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी ते नदीच्या पात्रात उतरले. मात्र पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आल्यामुळे ते यात बुडाले. सदर घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याबाबतची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. तथापि, यात यश आले नाही.
अखेर यासाठी राज्य आपत्ती दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाला कमलाकर हिंमत पाटील यांचा मृतदेह आढळून आला. नदीपात्रात सुमारे दोनशे फुट अंतरावर त्यांचा मृतदेह पहाटे आढळून आला असून एसडीआरएफच्या पथकाने त्यांचे पार्थिव बाहेर काढले. मयत कमलाकर हिंमत पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी तसेच तीन भाऊ व त्यांचे कुटुंब असा परिवार आहे. ते दुध विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांच्या निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.