चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : पुणे येथे रुग्णाला घेऊन जाणारी कार अडवून चोरट्यांनी कारमधील प्रवाशांकडून सव्वा लाखाचा ऐवज काढून पोबारा केला. ही घटना रविवारी पहाटे ४:१५ वाजेच्या सुमारास रांजणगाव ता. चाळीसगाव फाट्यानजीक घडली. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांनी कारमधील लोकांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या, रोकड, लॅपटॉप व मोबाइल हँडसेट, असा एकूण १ लाख २० हजारांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला.पाचोरा येथील डॉ. योगेश नेताजी पाटील यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना पुणे येथे दाखविण्यासाठी पत्नी नूतन, भाऊ दिनेश, दाजी भरत साहेबराव पाटील (सर्व रा. पाचोरा) हे कारने जात होते. कार रांजणगाव फाट्याजवळ आली असता गाडीला अवजड वस्तू लागून इंजिनमधून धूर येऊ लागला. त्यामुळे चालकाने वाहन थांबविले. एवढ्यात समोरून ७ ते ८ तरुण हातात काठ्या घेऊन गाडीकडे पळत-पळत येताना दिसले. त्यातील एक जण कारमधील लोकांच्या अंगावर धावून आला आणि कारमधील सर्वाच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या, रोकड, लॅपटॉप व मोबाइल हँडसेट, असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला आणि तेथून ते सर्वजण पसार झाले. या घटनेची माहिती संबंधितांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना दिली. सायंकाळी ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली. डॉक्टर दाम्पत्याला लुटण्यापूर्वी पहाटे चार वाजता याचं फाट्यावर सुरेश गोविंदा नागरगोजे (रा. रेणापूर जि. लातूर) यांच्याही वाहनाला काहीतरी लागल्याचा आवाज आला. मात्र काही लोक आपल्या गाडीकडे येत असल्याचे दिसताच ते तत्काळ गाडीत बसून तेथून निघून आले असेही फिर्यादीत नमूद आहे.









