मुंबई (वृत्तसंस्था) – कन्नड सिनेसृष्टीतले दिवंगत सुपरस्टार पुनीत राजकुमार यांना कर्नाटक राज्याचा सर्वोच्च पुरस्कार मरणोत्तर देऊन सन्मानित केलं जाणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुनीत राजकुमार यांना ‘कर्नाटक रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. राज्याच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित होणारे ते 10वे नागरिक असतील. 29 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने पुनीत राजकुमार यांचं निधन झालं. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, ‘अनेक व्यक्तींशी चर्चा केल्यानंतर पुनीत राजकुमार यांना मरणोत्तर कर्नाटक रत्न पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सरकार त्याची घोषणा करीत आहे.’ बोम्मई पुढे म्हणाले, ‘अभिनेते पुनीत राजकुमार यांचं नाव अमर व्हावं, यासाठी अनेक सूचना आल्या आहेत. सरकारची इच्छादेखील तशीच आहे. पुनीत यांचे आई-वडील डॉ. राजकुमार आणि पर्वतम्मा राजकुमार यांच्याप्रमाणेच त्यांचं समाधिस्थळ विकसित केलं जाईल.’ वडिलांनाही मिळाला होता हाच सन्मान विशेष बाब म्हणजे पुनीत राजकुमार यांचे दिवंगत वडील डॉ. राजकुमार यांना 1992 मध्ये कवी कुवेप्पू यांच्यासोबत कर्नाटक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
हा सन्मान मिळवणाऱ्या इतर व्यक्तींमध्ये एस. निजलिंगप्पा (राजकारण), सीएनआर राव (विज्ञान), डॉ. देवी प्रसाद शेट्टी (वैद्यकशास्त्र), भीमसेन जोशी (संगीत), शिवकुमार स्वामीजी (समाजसेवा) आणि डॉ. जे. जावरेगौडा (शिक्षण आणि साहित्य) यांचा समावेश आहे.
कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं 29 ऑक्टोबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. अवघ्या 46 व्या वर्षी पुनीत यांनी जगाचा निरोप घेतल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. फिटनेसबाबत अतिशय सजग असलेल्या पुनीत राजकुमार यांनी वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी एक्झिट घेतली. पुनीत यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
पुनीत यांचं जाणं त्यांच्या चाहत्यांच्या जिव्हारी लागलं. पुनीत राजकुमार यांनी अनेक कन्नड चित्रपटांत अभिनय करताना स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांच्या अभिनयाने अनेकांना भुरळ घातली आहे. उत्कृष्ट अभिनयाच्या बळावर त्यांना विविध पुरस्कार मिळाले होते. आता कर्नाटक राज्याचा सर्वोच्च सन्मानही त्यांना मिळणार आहे.