पुणे (वृत्तसंथा) – वखार महामंडळाच्या समोर चौकात उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. मात्र, या उड्डाणपुलाची लांबी वाढवावी, असे पत्र ‘कृषी उत्पन्न बाजार समिती’ने दिले आहे. त्यावर महापालिका प्रशासन काय निर्णय घेणार, या कामाला ब्रेक लागणार की काही तोडगा काढणार याविषयी उत्सुकता आहे.
समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी हे पत्र पाठवले आहे. मार्केटयार्डाचा मुख्य बाजार हा पोस्ट ऑफिस चौकापासून सुरू होतो. प्रस्तावित उड्डाणपूल हा पोस्ट ऑफिसपर्यंत बनवल्यास मार्केटयार्डमध्ये माल घेऊन येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांमुळे तेथे वाहतूक कोंडी होऊ शकते. नेहरू रस्ता आणि शिवनेरी रस्त्याच्या शेजारी वखार गोडाऊन तसेच बाजार समितीच्या परवानाधारक व्यावसायिकांची जमीन आहे. तेथे माल उतरवण्यासाठी ट्रक उभे केले जातात.
बाजारातून बाहेर जाणारी वाहने पोस्ट ऑफिसच्या चौकात एकाच वेळी आल्यास येथे वाहतूक कोंडी होऊ शकते. त्याचा परिणाम तेथील व्यवसायावर होऊ शकतो, असे समितीचे म्हणणे आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, धान्य, फळे, भाजीपाला आणि अन्य घाऊक मालाच्या मागणीत वाढ होणार आहे. त्यामुळे या वाहनांची संख्याही भविष्यात वाढू शकते. त्यामुळे मे. पारख ऍग्रो फुड्सपर्यंत हा उड्डाणपूल न करता तो पुढे गंगाधाम चौक किंवा पीएमपी बसस्थानकापर्यंत घ्यावा, अशी समितीची मागणी आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे पत्र मिळाले आहे. यावर विचार करण्यात येईल. प्रस्तावित विषयाची निविदा प्रक्रिया झाली आहे. खर्चामध्ये वाढ होणार असेल, तर निविदा प्रक्रिया पुन्हा करावी लागेल. मात्र, यामध्ये कोणता सुवर्णमध्य काढता येईल, याचा विचार केला जाईल. – श्रीनिवास बोनाला, प्रकल्प प्रमुख.