अमळनेर तालुक्यात महिन्याभरात दुसरी गंभीर घटना
अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील हिंगोणे खु. येथील सर्पदंश झालेल्या महिलेचा धुळे येथील हिरे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच सर्पदंशाने एका लहान मुलाचा जीव गेल्याची घटना घडली आहे. त्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामीण आरोग्य केंद्राच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तालुक्यातील हिंगोणे खु. येथील रहिवासी रंजना आधार कोळी (वय ५७) ह्या आपल्या शेतात मुगाच्या शेंगा तोडत असताना त्यांच्या डाव्या पायावर विषारी सापाने चावा घेतला. त्यांच्या मुलाने त्यांना अमळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्याचे सांगितल्याने त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना तपासले असता अमळनेर ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिेलेटर यंत्रणा हाताळण्यासाठी तंत्रज्ञ नसल्याचे कारण देत डॉक्टरांनी धुळे येथे हलविण्याचे सांगितले.
त्यानंतर त्यांना अँब्युलन्सने धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र आधी अमळगाव, नंतर अमळनेर व त्यानंतर धुळे अश्या या सगळ्या धावपळीत वेळ वाया गेल्याने रंजनाबाई यांची तब्येत अधिक खालावली. तेथे उपचार सुरू असताना चार दिवसांनी ६ रोजी रंजनाबाईंचा मृत्यू झाला. धुळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येवून ती मारवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ संजय पाटील करीत आहेत.
यापूर्वीही गेला बालकाचा जीव
दि. २९ रोजी डांगर येथील आकाश राजेंद्र भिल या शाळकरी विद्यार्थ्याचा देखील व्हेंटिलेटर न मिळाल्याने आणि डांगर, जानवे, अमळनेर आणि धुळे अशा प्रवासात वेळ गेल्याने त्याचाही मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर यंत्रणेने आणि शासनाने योग्य दखल घेतली नाही. त्यामुळे महिलेला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे मंत्र्यांच्या तालुक्यात हि स्थिती आहे. इतर तालुक्यात तर आणखी बिकट अवस्था आहे. अमळनेरला एक वर्षांपासून उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले असून चार कोटी निधी देखील उपलब्ध झाला होता.