जळगाव एलसीबीच्या पथकाचे यश
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ व मुक्ताईनगर तालुक्यातील ३ पेट्रोल पंपांवर दरोडा टाकत तेथील रक्कम लुटल्याप्रकरणी तसेच कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी जळगाव एलसीबीने संशयित आरोपींना अटक केली आहे. यामध्ये अकोला येथील कुख्यात गुन्हेगाराचा देखील समावेश आहे. तांत्रिक विश्लेषणावरून हा सखोल तपास करण्यात यश आले आहे.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर ९ ऑक्टोबर रोजी सशस्त्र दरोडा टाकत लूट करण्यात आली होती. त्यानंतर दरोडेखोरांनी कर्की फाटा, ता.मुक्ताईनगर येथील मनुभाई आशीर्वाद पेट्रोल पंप व वरणगाव शिवारातील तळवेल फाटा येथील सैय्यद पेट्रोल पंपावर लूट करीत सीसीटीव्ही फोडून डीव्हीआर लांबवत तब्बल १ लाख ३३ हजारांची लूट केली होती. जळगाव गुन्हे शाखेने ४ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर या दरोड्याची उकल करीत भुसावळसह अकोला तालुक्यातील ५ आरोपींना अटक केली आहे. तर आरोपींचा एक अल्पवयीन साथीदारही ताब्यात घेण्यात आला आहे.
सचिन अरविंद भालेराव (वय ३५, भुसावळ, ह.मु.खकनार, जि.बर्हाणपूर, मध्यप्रदेश), पंकज मोहन गायकवाड (वय ३०, वेडीमाता मंदीर, जुना सातारा रोड, भुसावळ), हर्षल अनिल बावस्कर (वय २१, बाळापूर, जि. अकोला), देवेंद्र अनिल बावस्कर (वय २३, बाळापूर, जि.अकोला), प्रदुम्न दिनेश विरघट (वय १९, श्रध्दा नगर, कौलखेड अकोला) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून ४० हजारांची रोकड, तीन गावठी पिस्टल तसेच पाच मॅग्झीन, ९ मोबाईल फोन, निळया रंगाची सॅक बॅग जप्त करण्यात आली.
जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, शेखर डोमाळे, जितेंद्र वल्टे, ग्रेडेड पीएसआय रवी नरवाडे यांनी ४ आरोपींना नाशिक येथून तर एका आरोपीसह एका अल्पवयीनाला अकोला येथून ताब्यात घेतले. आरोपींना तपासकामी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अटकेतील आरोपी सचिन अरविंद भालेराव (वय ३५, भुसावळ, ह.मु. खकनार, जि.बर्हाणपूर) याच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात खुनाचा प्रयत्न व दंगा करणे असे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपीला २०२४ मध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे दोन वर्षाकरीता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.