जैन तत्त्वज्ञानानुसार, स्थूल भौतिक पदार्थाला पुद्गल म्हणतात. पुद्गल क्षणिक सुख देणारे आणि अनंतकाळ दुःख देणारे ठरतात. आजचा माणूस हा भौतिक सुखात रमलेला आहे. पुद्गलांमध्ये सुख आहे असे समजून बसलेला आहे. खरे सुख हे आत्म्याच्या कल्याणात आहे. पुद्गलानंदी नव्हे तर आत्मानंदी बनावे असे आवाहन परमपूज्य सुमितमुनिजी म. सा. यांनी आजच्या प्रवचनातून केले. स्वाध्यायभवन येथे शासनदीपक परमपुज्य सुमितमुनिजी म.सा., प.पू.श्री ऋतुप्रज्ञजी म.सा., प.पू.श्री भुतीप्रज्ञमुनिजी म. सा. आदी ठाणा यांच्या सान्निध्यात प्रवचन सुरू आहे.
आपण चुकीच्या जागी, चुकीचे शोधत आहोत याबाबत दोन सरदारांची मिश्किल गोष्ट प्रचनात सांगितली. एक खेड्यात राहणाऱ्या सरदाराने ताजमहालची खूप महती ऐकली. आग्रा येथे जाऊन आपण ताजमहाल बघायचा त्यासाठी रेल्वेचे तिकीट काढून प्रवास करू लागला. रेल्वे थांबली. शेजारच्याच्या रेडिओवर ये आग्रा केंद्र है असे ऐकल्यावर सरदारजी घाईने रेल्वेतून उतरले रिक्षा केली व ताजमहाल घेऊन चल असे सांगितले. रिक्षा चालकाने त्याला फसवले व अन्यत्र सोडून दिले. थकलेल्या त्या सरदाराला ताजमहाल काही बघायला मिळाला नाही. त्याला बघून दुसरा सरदार आला विचारपूस झाली. मला ताजमहाल मिळत नाही असे म्हटल्यावर सरदाराने त्याच्या कानशिलात मारली.. तू ताजमहालचे घेऊन बसला अरे मी तर सहा महिन्यांपासून कुतुब मिनार शोधतो आहे तो मला मिळत नाही… या सरदारांप्रमाणे आपली अवस्था झाली आहे. पुद्गलामध्ये सुख नाही परंतु त्याच्यात सुख शोधायला आपण निघालो आहोत. भोगी नव्हे तर अभोगी बनावे व आत्म्याचे उत्थान करून घ्यावे असे आवाहन प.पू. महाराज साहेबांनी केले.
प.पू. सुमितमुनीजी महाराजांच्या प्रवचनाआधी प.पू.श्री ऋतुप्रज्ञजी म.सा. यांनी वैशाली गणराज्याचे अधिपती राजा चेतक यांची कन्या आणि राजा श्रेणिक यांची क्रमशः सुरू असलेली गोष्ट पुढे सांगितली. क्रोधामुळे श्रेणिकची काय अवस्था होते त्याबाबचे पुढचे कथानक सांगण्यात आले.