पालक धक्क्यात, मुलांकडे लक्ष देण्याची गरज
भुसावळ (प्रतिनिधी) – आजकाल मुलांकडे लक्ष देण्यामध्ये पालकांची कसरत होत आहे. त्यातच, एका १४ वर्षीय मुलाने तर सुट्टीत गावाकडे गेल्यावर तेथून अज्ञात व्यक्तीचा गावठी कट्टाच (पिस्तूल) उचलून आणला. महिनाभर पालकांना काहीच माहिती नाही. आणि शाळा सुरु झाल्यावर मुलगा शाळेत गेला, तेव्हा त्याच्या दप्तरात हा कट्टा आढळल्याने शाळा प्रशासन हादरले. त्यात मुलाच्या पालकांना तर मोठा धक्का बसला आहे. हि घटना भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या अकलूद येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये उघडकीस आली आहे. चक्क नववीच्या विद्यार्थ्याकडे गावठी बनावटीचा कट्टा (पिस्तूल) आढळला असल्याने शिक्षकही चक्रावले असून संशयित मुलाविरुद्ध शाळेच्या प्राचार्यांच्या फिर्यादीनुसार फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळातील एका उच्चभ्रू भागातील रहिवासी कर्मचार्याचा मुलगा हा अकलूदजवळील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिक्षण घेतो. त्याचे वडील हे रेल्वेत तिकीट तपासनीस आहेत. शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे मागील महिना-दीड महिन्यापूर्वी ते त्यांच्या गावाकडे परराज्यात गेले होते. त्यावेळी या अल्पवयीन मुलाने तेथील एका लग्नाच्या कार्यक्रमातून एकाचा गावठी कट्टाच बॅगेत घातला. तेथून तो भुसावळात आणेपर्यंत कोणालाच कळले नाही. विशेष म्हणजे, दीड महिन्यांनी शाळा सुरु होईपर्यंत घरातील पालकांना देखील मुलाकडे गावठी कट्टा असल्याचे समजले नाही.
शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी शाळा भरल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केल्यानंतर नववीच्या या विद्यार्थ्याकडे गावठी पिस्तूल आढळून आल्याने शिक्षकांमध्येही खळबळ उडाली होती. शाळा प्रशासनाला ही बाब कळवल्यानंतर फैजपूर पोलिसांना माहिती दिली. पालकांना माहिती मिळाल्यावर तर ते धावतच आले. आपल्या मुलाकडे गावठी पिस्तूल मिळाले यावर त्यांना विश्वासच नव्हता. आईला तर प्रकृती खराब झाल्याने दवाखान्यात न्यावे लागले. या गावठी कट्ट्यात एकही काडतूस नसल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तो रिकामा कट्टा होता.
सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ व सहकार्यांनी कट्टा जप्त केला असून विद्यार्थ्याची कसून तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान हा प्रकार त्याने अजाणतेपणी घडला असला तरीही मुलांवर पालकांनी लक्ष देणे किती गरजेचे झाले आहेत, हे अधोरेखित झाले आहे. या प्रकरणी संशयित विधिसंघर्षित विद्यार्थ्याविरोधात पोदार शाळेचे प्राचार्य आनंद हिरालाल शहा यांनी फिर्याद दिल्यावरून फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रभाकर चौधरी करीत आहेत.