अमळनेर न्यायालयाचा निर्णय,चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी प्रौढाला चार वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमळनेर येथील तदर्थ व अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश-१ सी.व्ही. पाटील यांनी सोमवार हा निकाल दिला.
अशोक देवराम पाटील (५८, रा. वाळकी, ता. चोपडा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ही घटना २०२३ मध्ये घडली होती. ऊसतोड कामासाठी आलेला एक परिवार शेतात झोपडी बांधून राहत होता. पती-पत्नी कामावर गेले असताना, संशयिताने त्यांच्या पीडित मुलीला गोड बोलून घरात बोलावून गैरवर्तन केले.
मुलीने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. पालक घरी आल्यानंतर हा प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितला. याबाबत चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.(केसीएन)तसेच याप्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा खटला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश-१ सी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात सुरु होता.
सरकारी वकील अॅड. के. आर. बागुल यांनी ७ साक्षीदार तपासले. फिर्यादी, अल्पवयीन पीडिता, प्रत्यक्षदर्शी व तपास अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या साक्षी घेण्यात आल्या. न्यायालयाने आरोपीस पोक्सो कलम ८ अंतर्गत ३ वर्षाची सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड (दंड न भरल्यास २ महिने कैद) आणि कलम १२ अंतर्गत १ वर्षांची सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड अशी एकूण ४ वर्षांची शिक्षा सुनावली.