भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : – शहरातील गंगाराम प्लॉट भागामध्ये एका प्रौढ व्यक्तीने कौटुंबिक वादातून बंदुकीने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. १२ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
डिगंबर मेंदिराम बढे (वय ५२, रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ) असे मयत प्रौढ इसमाचे नाव आहे. ते पत्नीसह राहत होते. मनीष ट्रॅव्हल्स येथे ते मेंटेनन्स विभागात काम करीत होते. काही दिवसांपासून त्यांचे पत्नीशी कौटुंबिक वाद झाले होते. या वादातून त्यांची पत्नी माहेरी निघून गेली होती.(केसीएन)डिगंबर बढे यांच्या मुलीचा विवाह झाला असून त्या सासरी खडकी ता. भुसावळ येथे राहतात. सोमवारी सकाळी ११ वाजता डिगंबर बढे यांनी घरी कोणी नसताना त्यांच्या खोलीमध्ये बंदुकीने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
गोळीचा आवाज ऐकताच शेजारी नागरिक धावत आले. सदरची घटना पाहताच अनेकांना धक्का बसला. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी सुरू केली आहे. तसेच घटनास्थळी मोबाईल फॉरेनसिक व्हॅन दाखल झाली. त्यांनी काही नमुने तपासणीसाठी घेतले आहे. दरम्यान आत्महत्येसाठी वापरलेली बंदुक विनापरवाना असल्याचे तसेच त्यात एकच काडतूस असल्याचे तपासात दिसून आले आहे. गोळी थेट डोक्यात शिरून अडकून बसली आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी तपास करीत आहेत. तर इसमाच्या आत्महत्येमुळे भुसावळ तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.