यावल तालुक्यातील साकळी येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकळी येथील प्रौढाचा शिरसाड शेत शिवारात विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी रात्री घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
साकळी येथील रहिवासी दिलीप सुकलाल मराठे (वय ५५) हे शिरसाड शिवारातील एका शेतातील विहिरीजवळ गेले. दरम्यान त्यांचा पाय घसरला अन् ते विहिरीत कोसळले. हा प्रकार दिसल्यानंतर तातडीने नागरिकांनी धाव घेत रात्री उशिरापर्यंत विहिरीत त्यांचा शोध घेण्यात आला. परंतु, मध्यरात्री ३ वाजता मिळाल्यानंतर त्यांना यावल ग्रामीण रूग्णालयात आणले होते. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत्यू घोषित केले.
दरम्यान, घटनास्थळी सहायक फौजदार अर्जुन सोनवणे, हवालदार मोहसीन खान यांनी पथकासह धाव घेत चौकशी केली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात नीलेश एकनाथ मराठे यांच्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.