भोपाळ ( वृत्तसंस्था ) – समसगड जंगलात महिला आणि तिच्या मुलाचा मृतदेह सापडला. महिलेचा खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता आणि बलात्कार करणारा तिचा बापच होता, असे पोलिसांनी म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी समसगडच्या जंगलात एका महिलेचा आणि एका लहान मुलाचा छिन्न-विच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडला होता. पोलिसांनी तपास केला हा मृतदेह सिहोर जिल्ह्यातील बिल्किसगंज येथील महिलेचा असल्याचे आणि मृत मुलगा तिचा मुलगा असल्याचे समोर आले.
मृत महिलेने प्रेम विवाह केल्यामुळे तिचे कुटुंबीय संतप्त होते. पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली असता वडिलांचा संशय आला. कसून चौकशी केल्यानंतर वडिलांनी गुन्हा कबूल केला. आरोपी वडिलांनी म्हटले आहे, की त्यांच्या मुलीने लव्ह मॅरीज केले होते. मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने गावातील लोक टोमने मारत होते.
मुलगी लग्नापासून घरी आलीच नव्हती. मात्र, या दिवाळीला ती त्याच्या (आरोपीच्या) मोठ्या मुलीसोबत घरी आली होती. यातच तिच्या 8 महिन्याच्या मुलाचा आजाराने मृत्यू झाला. या सर्व दुःखाच्या परिस्थितीत मोठ्या मुलीने तिच्या वडिलांना फोन करून याची माहिती दिली. यानंतर तिचे वडील आपल्या मुलाला घेऊन रातीबड येथे पोहोचले आणि संबंधीत चिमुकल्याचा मृतदेह दफन करण्यासाठी ते मुलीला घेऊन समसगडच्या जंगलात गेले. येथेच त्यांचा मुलीसोबत प्रेम विवाहावरून वाद झाला. यानंतर आरोपीने मुलीवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. आरोपी बापावर आयपीसी कलम 302, 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.