नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – हरियाणामध्ये प्रेमप्रकरणातून मुलीच्या कुटुंबीयांनी टोकाचं पाऊल उचलत बेदम मारहाण करून तरुणाची हत्या केली आहे.
हरियाणातील सोनिपतमध्ये राहणाऱ्या बिजेंद्रचं एका मुलीवर प्रेम होतं. त्यांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. मात्र घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळेच दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता.
मुलगी घरातून पळून जाणार असल्याची माहिती कुटुंबीयांना समजल्यावर त्यांनी मुलाचाच काटा काढण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या हत्येचा कट रचला. सुरुवातीला मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाचा अपघात झाल्याचा बनाव रचला. मात्र तरुणाच्या नातेवाईकांनी ही हत्याच असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तरुणाच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, बिजेंद्रचं गावातील एका मुलीवर प्रेम होतं. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. पण मुलीच्या कुटुंबीयांना हे मान्य नव्हतं. त्यामुळेच त्यांनी बिजेंद्रची हत्या केली आहे.
सुरुवातीला आरोपींनी बिजेंद्रच्या भावाला फोन करून 20 हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार भाऊ सांगितलेल्या पत्त्यावर पैसे घेऊन पोहोचला पण तिथे बिजेंद्र सापडलाच नाही. परिसरात त्याचा शोध घेण्यात आला पण काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर आरोपींनी पुन्हा फोन करून तरुणाला गोहाना येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती दिली . बिजेंद्रचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांना त्याचा मृतदेह मिळाला. बिजेंद्रच्या भावाने त्याची हत्या करून त्याला रुग्णालयात सोडल्याचं म्हटलं आहे.
बिजेंद्रच्या शरीरावर मारहाणीच्या असंख्य जखमा आहेत. आरोपींनी हत्या केल्यानंतर रुग्णालयात मात्र अपघात झाल्याचं सांगितलं. उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. कुटुंबीयांनी ही हत्याच असल्याचं म्हणत मुलीच्या घरच्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.