जळगाव, चोपडा तालुक्यातील प्रकार उघडकीस
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील एका गावात तसेच चोपडा तालुक्यात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह केल्याचा आणि त्यानंतर ती गर्भवती राहून तिने बाळाला जन्म दिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी मुलीच्या पतीसह, तिच्या आई-वडिलांसह, आणि लग्न लावून देणाऱ्या एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुलीच्या पतीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील ही अल्पवयीन मुलगी नुकतीच प्रसूतीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाली होती. बाळाला जन्म दिल्यानंतर, रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रक्षा रोकडे यांनी तिचे वय केवळ १७ वर्ष असल्याचे लक्षात येताच, याची माहिती तात्काळ जळगाव तालुका पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक विजय पाटील, देविदास चिंचोरे यांनी तात्काळ चौकशी सुरू केली. पोलिसांनी रुग्णालयातील कागदपत्रे आणि त्यानंतर पीडित मुलगी शिकत असलेल्या शाळेतून तिचा जन्म दाखला मिळवला. या दोन्ही कागदपत्रांवरून पीडितेचे वय केवळ १७ वर्ष (अल्पवयीन) असल्याचे स्पष्ट झाले.
चौकशीत असे निष्पन्न झाले की, पीडित मुलीच्या कुटुंबियांनी १५ मार्च २०२४ रोजी तिचा विवाह चोपडा तालुक्यातील एका तरुणासोबत लावून दिला होता. कायद्यानुसार, मुलीचे लग्नाचे वय किमान १८ वर्ष असणे बंधनकारक असताना हा बालविवाह करण्यात आला. लग्नानंतर ती गर्भवती राहिली आणि नुकताच तिने एका बाळाला जन्म दिला. या अत्यंत गंभीर प्रकरणात, पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन सोमवारी, ८ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल केला आहे.
मुलीचा पती, सासू, सासरे, मुलीचे आई-वडील, मामा आणि लग्नात सामील असलेले इतर नातेवाईक अशा एकूण १० जणांविरुद्ध वेगवेगळे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या पतीला पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.









