यावल तालुक्यातील घटनेचा यशस्वी तपास, एलसीबीची दमदार कामगिरी
जळगाव ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील दोनगाव शिवारात प्रमोद श्रीराम बाविस्कर यांना गोळी मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न दि. १० जुलै रोजी रात्री ९ च्या सुमारास करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीरीत्या करत पाच आरोपींना अटक केली आहे. या घटनेप्रकरणी चोपडा तालुक्यातील पुनगाव येथील सरपंचासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी बुधवार दि. ६ ऑगस्ट रोजी पत्रकारांना दिली.घटनेनुसार, अज्ञात व्यक्तीने प्रमोद बाविस्कर यांच्यावर बंदुकीने गोळीबार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर तो अनोळखी साथीदारासह मोटारसायकलवरून पळून गेला. (केसीएन)या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र गुन्हा उघडकीस येत नव्हता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे आणि शरद बागल यांनी दोन तपास पथके तयार केली.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. पोलिसांनी नाशिक, उमर्टी आणि अडावद येथे छापे टाकून पाच आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये खुनाच्या कटाचे सूत्रधार तथा चोपडा तालुक्यातील पुनगावचे सरपंच किशोर मुरलीधर बाविस्कर (वय ४०), दर्शन रविंद्र देशमुख (वय २५), गोपाल संतोष चव्हाण (वय २५), विनोद वसंतराव पावरा (वय २२) आणि सुनिल सुभाष पावरा (वय २२) यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. (केसीएन)पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली बंदूक आणि मोटारसायकल जप्त केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करत आहेत.
प्रमोद बाविस्कर यांच्या भावाने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. आत्महत्याला प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित आरोपी किशोर बाविस्कर यांच्यासह त्याच्या भावाला आरोपी करण्यात आले होते.(केसीएन)यासह राजकीय क्षेत्रातील वैमनस्य या दोन कारणांमुळे प्रमोद बाविस्कर यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली. किशोर बाविस्कर यांनी शुभम देशमुख याला खून करण्याबाबत सांगितले. त्यानुसार शुभमने त्याचा मित्र गोपाल चव्हाण याच्यासोबत रेकी करून प्रमोद बाविस्कर यांची येण्याजाण्याबाबतची सर्व माहिती काढून घेतली.
यानंतर त्याने त्याच्या माहितीतील उमर्टी गावातील विनोद पावरा व सुनील पावरा या दोघांना माहिती देऊन खून करण्याबाबत सांगितले. त्यानुसार हा कट पूर्ण करण्यात आला.(केसीएन)मात्र या घटनेमध्ये किशोर बाविस्कर हे गंभीर जखमी झाले व बचावले. तपासामध्ये किशोर बाविस्कर याने शुभमला फोन पे द्वारे पन्नास हजार ट्रान्सफर केल्याचेही दिसून आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. या महत्वपूर्ण गुन्ह्याच्या तपासाच्या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.
एलसीबीचे संदीप पाटील, वरिष्ठ पो.नि., पो.नि. रंगनाथ धारबळे स.पो.नि. अजयकुमार वाढवे (यावल पो.स्टे), पो.उ.नि. शरद बागल, सोपान गोरे, जितेंद्र वाल्टे, पो.हे.काँ. सुनिल दामोदरे, प्रितम पाटील, यशवंत टहाकळे, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, विलेश सोनवणे, संदीप चव्हाण, पो.कॉ. बबन पाटील, सिध्देश्वर डापकर, रावसाहेब पाटील, ईश्वर पाटील, गोपाल पाटील, चालक पो.कॉ. महेश सोमवंशी, बाबासाहेब पाटील पो.हे.कॉ. वासुदेव मराठे, संदीप सूर्यवंशी पो.ना. किशोर परदेशी पो.कॉ. सचिन पाटील, योगेश खोंडे, भरत कोळी, सागर कोळी (सर्व यावल पो.स्टे.) यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.