जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसोली प्र न येथील प्राजक्ता बुंधे ( बारी ) यांच्या संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर आता प्राजक्ताच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पतीसह सासरच्या ५ लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
प्राजक्ताची आई मालती नंदलाल बारी ( वय ४० धंदा- शेत मजुरी रा. शेंदुर्णी ता.जामनेर ) यांनी आज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , त्या शेंदूर्णीत एकट्या राहतात . त्यांचे पती २३ वर्षांपूर्वी मयत झाले आहेत . प्राजक्ता एकुलती एक होती तिचे शिरसोली येथील अजय अशोक बुंधे ( बारी ) यांचेशी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी शेंदुर्णी येथे लग्न झाले होते. जावई अजय याला लग्नात ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, दिड तोळयाची गळयातील चैन हुंडा स्वरूपात दिली होती . लग्न झालेपासून मुलगी फक्त १५ दिवस सासरी समाधानात होती.
मार्च २०२१ मध्ये जावई अजय बुंधे ( बारी ) यांची आजी रुपाबाई नागपुरे ( रा. शेंदुर्णी) ही मयत झाल्याने प्राजक्ता शेंदुणी येथे आली होती तेव्हा प्राजक्ताने मला व इतर नातेवाईकांना सांगीतले की, पती, सासु, सासरे, जेठ व ननंद असे टोचून बोलत होते की, तुझ्या आईने लग्नात मानपान दिला नाही. लग्न आमच्या मनासारखे केले नाही. दागीने घेतले नाही . प्राजक्ता शेंदुर्णी येथे आली असतांना तिला घेण्यासाठी तिचे सासरचे कोणीही आले नाही म्हणून मी जावई अजय यांना विचारणा केली असता त्यांनी मला सांगीतले की, हैद्राबाद येथे नोकरीसाठी जात आहे प्राजक्ताला तुमच्याकडेच राहु दया नंतर प्राजक्ता २ महिने माहेरी शेंदूर्णीतच होती.
जुन २०२१ मध्ये सासरे अशोक बुंधे ( बारी ) प्राजक्ताला घेण्यासाठी आल्याने त्यांचेसोबत पाठवीले होते. जुलै २०२१ मध्ये ती पती व सासु सासरे यांचेसोबत हैद्राबाद येथे गेली होती. हैद्राबाद येथे जावई सोबत राहत असतांना प्राजक्ताने फोनव्दारे पती, सासु, सासरे पैशासाठी त्रास देत असल्याचे सांगीतले होते. जावई व सासरा नेहमी फोनव्दारे ६ लाख रुपये हुंडा देण्या-या ब-याच मुली मिळत होत्या, तुम्ही लग्नात काही दिले नाही.आता २ लाख रुपये दया नाहीतर आम्ही मुलीला वागवणार नाही असे मालती यांना बोलत होते. मालती यांनी त्यांना माझी कुवत नाही असे समजावून सांगीतले होते. ऑगस्ट २०२१ मध्ये जावई व मुलगी आणि सासु-सासरे पुन्हा शिरसोली येथे राहण्यासाठी आले होते.
सप्टेबर २०२१ मध्ये पोळा निमीत्त मुलगी प्राजक्ता हिस माहेरी आणले. माहेरी प्राजक्ताने पुन्हा मालती आणि त्यांची बहिण यशोदाबाई बारी व इतर नातेवाईक यांना शिरसोली व हैद्राबाद येथे पती, सासु, सासरे, जेठ, ननंद यांनी पैशाची मागणी करून त्रास दिलेबाबत सांगीतले होते. नंतर ३ महिने तिला घेण्यासाठी सासरचे कोणीही आले नाही म्हणुन पुंडलीक बारी यांचेसोबत प्राजक्ताला सासरी पाठवीले असता सासरचे लोकांनी या दोघांना शिवीगाळ करून परत पाठवीले होते.
नंतर २८ डिसेंबर २०२१ रोजी पती, सासु, सासरे, जेठ विजय यांनी आम्ही आता मुलीला त्रास देणार नाही असे सांगीतल्यावर प्राजक्ताला शिरसोली येथे पाठवीले होते. तेव्हापासुन मुलीच्या सासरच्या लोकांनी प्राजक्ताला आईशी कोणताही संपर्क करू दिला नाही.
आज सकाळी मालती यांच्या बहिणीची सुन प्रमिला बारी घरी आली तिने सांगीतले की, प्राजक्ताची तब्बेत बरी नाही शिरसोली जायचे सांगीतल्याने मी नातेवाईकांसोबत शिरसोली येथे आले. शिरसोली येथे मयत अवस्थेत तिला घरात ठेवलेले होते. तिचे गळयास लालसर व काळपट रंगाचा गोलाकार व्रण दिसला. मी सासरचे लोकांना विचारपुस केली असता त्यांनी माहिती दिली नाही.
तेव्हा माझी खात्री झाली की, प्राजक्ताचा मृत्यू अजय बुंधे (पती) , अशोक बुंधे (सासरा) , शोभाबाई बुंधे (सासु) , विजय बुंधे (जेठ) , वैशाली अशोक काळे (ननंद , सर्व रा. शिरसोली प्र न ) यांनी घडवून आणला आहे. या आरोपींच्या विरोधात भादवि कलम 304 (ब) ,498 (अ) या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहेत.
शवविच्छेदनानंतर प्राजक्ता बारी हिच्या मृतदेहावर आज सायंकाळी माहेरी शेंदुर्णी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले .