जळगाव(प्रतिनिधी) – उद्योगातली काही माणसं फार मोठमोठी कर्ज भरमसाठ व्याजानं उचलताना मी नेहमी पाहतो. अगदी क्षणात त्यांना जग जिंकायचं असतं. मला मात्र वैयक्तिकरीत्या हे ‘सतत धोके पत्करण्याचं’ तत्वज्ञान पटत नाही.
नोकरी असो की व्यवसाय, वारंवार असे धोके पत्करणं म्हणजे हमखास अपयशाची खात्री. त्यातही रागारागात, भावनिक होऊन किंवा एखाद्यासोबत तुलना करत घेतलेले निर्णय बऱ्याचदा घात करतात. यात शिक्षण, संस्कार किंवा तुमचे बॅकग्राऊंड याचा काहीही संबंध नसतो. आपली सद्सदविवेकबुद्धी, वेळ, आपण करत असलेल्या कामाबद्दलची आर्थिक तसेच तांत्रिक बाजू पूर्ण माहिती आणि नशीब सोबत असणे अत्यंत गरजेचं असतं आणि त्या सोबतच आपल्यासोबत सतत एक मेंटॉर असलाच पाहिजे जेणेकरून आपण त्यांचे सल्ले, मदत व सर्वोत्परी सहकार्य घेतले तर आपण घेत असलेल्या रिस्कच्या आजूबाजूला अपयश फिरकत नाही, त्यात आपल्याला १०० टक्के यश मिळते. परंतु आपल्यासोबत असलेला मेंटॉर हा स्वार्थी नसावा जेणेकरून तो आपल्याला करीत असलेल्या सहकार्याचे बदल्यात त्याचा फायदा करून घेईल असे प्रतिपादन एस. पी. जैन, मुंबई येथील व्यवस्थापनशास्त्राचे प्राध्यापक व सुपरिचित प्रा. समिश दलाल यांनी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापक संचालक अविनाश जैन, विनले पॉलिमर्स प्रा. लीमिटेडचे संचालक प्रमोद संचेती, उद्योजक विश्वेश मणियार इस्टीट्यूटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करत सांगितले की आजकालच्या तरुणांनी जॉब सिकर न होता जॉब क्रियेटर व्हायला हवं म्हणजेच कि आजच्या पिढीने नौकरीच्या मागे न धावता उद्योजक होण्यास पसंती द्यायला हवी आणि असे झाल्यास देशाची आर्थिक प्रगती १०० टक्के होईल मुळात दो टाईम पंच आणि एक टाईम लंच असे साधारण आयुष्य न जगता काहीतरी वेगळ करायची आस ठेवा तसेच व्यवसायात बदल होणे आवश्यक आहे. पारंपारिक व्यवसायात त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन मिळाल्यास ते उत्तम प्रदर्शन करू शकतात. डॉ. अग्रवाल यांनी यावेळी आशा व्यक्त केली की या विषयावरील प्राध्यापक समिश दलाल यांचे व्याख्यान उपस्थितांसाठी नक्की उपयुक्त ठरेल. प्रा. समिश दलाल यांचा परीचय सदर करताना प्रा. राहुल त्रिवेदी यांनी माहिती दिली की, प्रा. समिश दलाल मुंबईचे एस. पी. जैन या महाविध्यालयात व्यवस्थापनाचे सहयोगी प्राध्यापक आहेत आणि संवाद, उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात खास आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलॅड विध्यापिठातून एमबीए केले. आणि हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि व्हार्टन बिजनेस स्कूल मधील दोन प्रमुख कार्यकारी शिक्षण कार्यक्रमाद्वारे त्यांचे कौशल्य आणखी वाढले. कौटुंबिक व्यवसायाच्या बाबतीत त्यांचा दीर्घ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी कौटुंबिक व्यवसायाच्या विषयावर दोन लाखाहून अधिक विध्यार्थ्यांना शिकवले आहे आणि पन्नास हजाराहून अधिक भारतीय कौटुंबिक व्यवसायांशी संबधित प्रकरणाचा अभ्यास केला आहे. प्रा. राहुल त्रिवेदी यांनी परिचय दिल्यानंतर प्रा. समिश दलाल हे आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, सबसे बडा रोग, क्या कहेगे लोग म्हणजेच कि आपण घेतलेल्या निर्णयावर किंवा एखाद्या कृतीवर लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपल्या मनात जे आहे तेच करा तसेच स्वतःवर असणारा विश्वास कोणत्याही चमत्काराची अपेक्षा करत नसतो, पण स्वतःवरच्या विश्वासा मुळेच कधीतरी जीवनात चमत्कार घडतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. भारतातही आजमितीस असे काही उद्योग आहेत, जे खूप मोठे धोके पत्करत नाहीत; पण अत्यंत नियोजनपूर्वक आणि अचूक वेळेस निर्णय घेऊन शतकाहून अधिक काळ टिकून आहेत. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा येत तो ‘लवचिकता’ आणि कॅल्क्युलेटेड रिस्कचा. खरे पाहता सारासार विचार, मानसिक कौटुंबिक आधार, तसेच प्रसंगानुरूप लवचिकता आणि नियोजनपूर्वक काम करून निर्णय घेतले तर हमखास यश मिळतेच. नोकरी उद्योग-व्यवसाय किंवा कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना आपल्याला त्यातून नक्कीच फायदा होईल, या अपेक्षेने आपण ती करतो, पण अपेक्षित फायदा नाही झाला तर? अपेक्षित रिझल्ट्स मिळाले नाहीत तर? फायदा सोडा जे पैसे, वेळ आणि ऊर्जा आपण गुंतवली तेही सर्व बुडाले तर? आपण तो धोका पचवू शकतो का? या अशा गुंतवणुकीमुळे किंवा आर्थिक निर्णयामुळे आपण आपले भविष्य तर अंधारात ढकलत नाही ना? एकंदर मानसिक आणि आर्थिक परिस्थितीवर काय परिणाम होतील? या सर्व प्रश्नांची सारासार उत्तरं सकारात्मक असतील तर पुढे जायचं. आपली वेळ आणि पैसा मौल्यवान आहे, तो गुंतवतानाही तसाच नीट विचार व्हायला हवा. भावनिक गुंतवणूक टाळून कॅलक्युलेटेड रिस्क घ्यायला हवी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी प्रा. तन्मय भाले, एमबीए विभागप्रमुख प्रा.डॉ. राजकुमार कांकरिया, एमसीए विभागप्रमुख प्रा.रफिक शेख, प्रा. मोनाली नेवे, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. कल्याणी नेवे, प्रा. विनोद महाजन व प्रा. योगिता पाटील यांनी सहकार्य केले.