प्रफुल्ल देवकर विरुद्ध जितेंद्र मराठे यांच्यात थेट लढत!
जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारी (दि. २) शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला होता. अनेक दिग्गजांनी माघार घेतली असली तरी, प्रभाग क्रमांक १३ ‘ड’ मध्ये भाजपने दिलेला धक्का माजी नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी पचवलेला नाही. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर मराठे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने भाजपसह महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे.


नेत्यांची मनधरणी ठरली निष्फळ..
जितेंद्र मराठे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, कार्यकर्त्यांचा वाढता दबाव आणि जनरेटा पाहता मराठे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी तब्बल एक ते दीड हजार नागरिकांनी गर्दी करत त्यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. “जनतेचा कौल शिरसावंद्य मानून मी ही निवडणूक लढवणारच,” अशी भूमिका घेत मराठे यांनी माघार घेण्यास नकार दिला.
कापलेली उमेदवारी आणि ‘स्वाभिमानी’ लढा..
गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक राहिलेल्या जितेंद्र मराठे यांचा उमेदवारी अर्ज पक्षाकडून कापण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी आपण अपक्ष म्हणून नशीब आजमावत असल्याचे मराठे यांनी स्पष्ट केले आहे.
प्रतिष्ठेची लढत: प्रफुल्ल देवकर विरुद्ध जितेंद्र मराठे
आता प्रभाग १३ ‘ड’ मधील लढत अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची ठरणार आहे. जितेंद्र मराठे यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते गुलाबराव देवकर यांचे पुत्र प्रफुल्ल देवकर यांच्याशी होणार आहे. एका बाजूला मातब्बर राजकीय वारसा असलेले प्रफुल्ल देवकर आणि दुसऱ्या बाजूला दांडगा जनसंपर्क असलेले अपक्ष उमेदवार जितेंद्र मराठे, यांच्यातील या थेट लढतीकडे संपूर्ण जळगाव शहराचे लक्ष लागून आहे.
प्रभागातील वाढते राजकीय तापमान पाहता, या “काटे की टक्कर” मध्ये मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.









