जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेनुसार आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या शिफारशीनुसार जळगाव जिल्ह्याच्या तीन सरचिटणीस आणि तीन तालुकाध्यक्ष यांच्या निवडीस मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये जमील शेख शफी शेख यांची दुसऱ्यांदा जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जळगाव जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांनी सर्व कार्यकारणी बरखास्त केलेल्या होत्या. त्यानंतर नवीन कार्यकारिणी घोषित करण्यासाठी तीन सरचिटणीस आणि तीन ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेला होता. या प्रस्तावाला रविवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी मंजुरी मिळाली आहे.
त्यामध्ये जमील शेख शफी शेख यांची सरचिटणीस (प्रशासन) म्हणून दुसऱ्यांदा फेरनिवड झाली आहे. तसेच मनोज मानसिंग सोनवणे – सरचिटणीस (संघटन), ज्ञानेश्वर शेनपडु कोळी,सरचिटणीस (जनसंपर्क) यांचीही नेमणूक झाली आहे. बोदवड, मुक्ताईनगर व चोपडा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी अनुक्रमे भरत त्र्यंबक पाटील, दिनेश सोपान पाटील आणि प्रदीप निंबा पाटील यांची देखील याच प्रस्तावाद्वारे निवड झाली आहे.
आगामी काळात जिल्ह्यातील इतर कार्यकारिणी जाहीर होईल. दरम्यान नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षाला अधिकाधिक संजीवनी देण्यासाठी तसेच पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया जमील शेख यांनी माध्यमांकडे व्यक्त केली.