नूतन मराठा महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान परंपरा आणि शाश्वत विकास’ परिषदेचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : भारतभूमी हि भारतीय ज्ञान परंपरेने समृद्ध आहे आणि ज्याप्रमाणे शिक्षणामध्ये इतर देश त्यांची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करतात तसाच प्रयत्न नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या माध्यमातून होत असून भारतीय ज्ञान परंपरा आणि संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रतिपादन प्रा. भुजंगराव बोबडे यांनी केले.
जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि भारतीय शिक्षण मंडळ, देवगिरी प्रांत यांच्या सयुंक्त विद्यमाने एक दिवसीय बहुविद्याशाखीय ‘भारतीय ज्ञान परंपरा आणि शाश्वत विकास’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले. चर्चासत्राचे उदघाटन व्यवस्थापन परिषद सदस्या प्रा. डॉ. पवित्रा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून खिरोदा येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लता मोरे, बीजभाषक प्रा. भुजंग रामराव बोबडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी भूषविले. सुरुवातीस चर्चासत्राचे संयोजक प्रा. डॉ. अविनाश बडगुजर यांनी भारतीय ज्ञान परंपरेवर प्रस्तावना सादर केली.
प्रा. भुजंग रामराव बोबडे यांनी त्यांच्या बीजभाषणात भारतीय ज्ञान परंपरेवर सविस्तर अभ्यासपूर्ण विवेचन केले. आपल्या बीजभाषणात त्यांनी आपल्या आजूबाजूला असलेला इतिहास जाणण्याचा व समजण्याचा आग्रह केला. भारतातील तत्वज्ञान, शिल्पकला, समाजव्यवस्था, वेद, उपनिषिदे, खगोलशास्त्र, वैदिक गणित, विज्ञान, मंदिरे, अजिंठा वेरूळ येथील गुफा या भारतीय ज्ञान परंपरेने भरलेल्या आहेत असे नमूद केले.
चर्चासत्राच्या समारोपासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. विनोद चौधरी हे उपस्थीत होते. सदर राष्ट्रीय परिषदेत ६० संशोधक आणि प्राध्यापक यांनी पेपर वाचन केले. यामध्ये १२५ संशोधक आणि प्राध्यापक उपस्थित होते, सदर परिषदेचा अहवाल वाचन प्रा. भागवत पाटील यांनी सादर केला. आभार प्रदर्शन प्रा. अविनाश बडगुजर यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. डॉ. आफाक शेख यांनी केले. परिषदेसाठी प्रा. डॉ. डी. आर चव्हाण, डॉ. साहेब पडलवार, डॉ. इंदिरा पाटील, डॉ. के. बी. पाटील, उपप्राचार्या डॉ. एम. एस. पाटील, डॉ. एस. आर. गायकवाड यांनी परिश्रम घेतले.