जळगाव “जीएमसी”मध्ये गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी
जळगाव (प्रतिनिधी) :- सोयगाव येथील ४० वर्षीय वक्तीला पोटात जीवघेण्या वेदना होत होत्या. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागात तपासणीअंती व शस्त्रक्रिया करून २ किलो वजनाची प्लीहा काढण्यात आली व त्यांना जीवदान लाभले. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी वैद्यकीय पथकाचे कौतुक केले.
सोयगाव तालुक्यातील कवली येथील रहिवासी असलेले ४० वर्षीय राजीव उखर्डू मालचे यांना गेल्या दोन वर्षांपासून पोटात तीव्र वेदना जाणवत होती. वारंवार होणाऱ्या वेदनांमुळे त्यांनी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल होण्याचा निर्णय घेतला. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना “ग्रॉस स्प्लेनोमेगली” या स्थितीचे निदान केले, ज्यामध्ये प्लीहा अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. रुग्णावर विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. तपासण्यांमध्ये राजीव मालचे यांची प्लीहा खूपच वाढलेली आढळली. यामुळे प्लीहा काढण्याची शस्त्रक्रिया करणे आवश्यक ठरले.
रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आवश्यक ते सर्व लसीकरण पूर्ण करण्यात आले. जेणेकरून ऑपरेशननंतर कोणतेही संसर्ग होण्याची शक्यता कमी राहील. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या सहकार्याने लसीकरण व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. उप अधिष्ठाता व शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्रा. डॉ. संगीता गवित यांनी रजिव मालोचे यांच्यावर ‘सप्लेनक्टॉमी’ (प्लीहा काढण्याची शस्त्रक्रिया) यशस्वीरीत्या पार पाडली. या शस्त्रक्रियेद्वारे २ किलो वजनाची प्लीहा काढण्यात आली, जी सामान्यत: १५० ते २०० ग्रॅम असते. प्लीहेचा हा असामान्य आकार पाहता शस्त्रक्रिया अत्यंत आवश्यक होती.
त्यांना शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. किरण सोंडगे यांच्यासह बधिरीकरण शास्त्र विभागातील प्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. अंजू पॉल, डॉ. क्षितिजा तोणपी यांच्यासह शस्त्रक्रियागृह इन्चार्ज परिचारिका तुळसा माळी यांनी सहकार्य केले. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी वैद्यकीय पथकाचे कौतूक केले.
“” रुग्णाला पोटदुखीची समस्या निर्माण झाली होती आणि रुग्णाला दैनंदिन जीवनात अनेक त्रासांना सामोरे जावे लागत होते. शस्त्रक्रियेनंतर प्लीहेचे वजन व इतर तपासण्या करण्यासाठी त्याचे नमुने हिस्टोपॅथॉलॉजी विभागाकडे पाठवण्यात आले. हे नमुने पुढील तपासणीसाठी वापरले जातील, ज्यातून प्लीहा वाढीचे नेमके कारण शोधले जाईल आणि रुग्णाच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळेल. शस्त्रक्रियेनंतर रजिव मालोचे यांच्या पोटातील वेदना बऱ्याच प्रमाणात कमी झाल्या आहेत. रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होत आहे, आणि त्यांना आता चांगला आराम मिळत आहे. “”
– डॉ. संगीता गावित, सहयोगी प्राध्यापक.