भुसावळ शहरातील शिवदत्त कॉलनीतील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- पिता-पूत्राच्या कौटुंबिक वादानंतर मुलाकडून त्रास होत असल्याने त्रस्त पित्याने हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केली. त्यावेळी मदतीसाठी गेलेल्या भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यावरच विकृत मुलाने चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना शहरातील गडकरी नगराजवळील शिवदत्त नगर परीसरात रविवारी ३१ रोजी दुपारी ३ वाजता घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
या हल्ल्यात बाजारपेठचे हवालदार अक्षय चव्हाण जखमी झाले आहे. त्यांना उपचारार्थ जळगावी हलवण्यात आले आहे. गडकरी नगराजवळील शिवदत्त कॉलनीत तरुण पित्याला त्रास देत असल्याने मदतीसाठी पित्याने हेल्पलाइनवरून मदत मागितली. बाजारपेठचे हवालदार अक्षय चव्हाण हे मदतीसाठी धावून गेले. संशयित मुलाला समज देवून सांगत असताना विकृत मुलाने स्वयंपाक घरातील चाकूने चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेनंतर संशयित पसार झाला.
जखमी अक्षय चव्हाण यांच्यावर स्थानिक स्तरावर उपचार केल्यानंतर त्यांना जळगाव येथे उपचारार्थ हलवण्यात आले. बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. संशयिताच्या अटकेसाठी पोलीस रवाना झाले आहेत.