भुसावळ शहरातील धक्कादायक घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- गडकरी नगरात पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला करणाऱ्या तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी १ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आले आहे. याबाबत पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
सुनिल मैलेलू (वय-२२, रा. शिवदत्त कॉलनी, भुसावळ) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. पिता-पूत्राच्या कौटुंबिक वादानंतर मुलाकडून त्रास होत असल्याने त्रस्त पित्याने पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केल्यानंतर मदतीसाठी गेलेल्या भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यावरच सुनिल मैलेलू या तरूणाने चाकूने हल्ला केला होता. ही घटना रविवारी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील गडकरी नगरात घडली होती.
त्यानंतर सुनिल मैलेलू हा पसार झाला होता. याबाबत त्यांच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सुनिल मैलेलू याने भुसावळ शहरातील सुंदर नगरातील रेल्वे रूळाजवळ धावत्या रेल्वेखाली येवून आत्महत्या केल्याचे सोमवारी १ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता समोर आले आहे.