पत्रकार परिषदेत दिली सविस्तर माहिती
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांसह पोलिसही हैराण झाले होते. मात्र आता जळगाव शहर पोलीस स्टेशनला उत्तम यश मिळाले आहे. त्यांनी केलेल्या धडक कारवाईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या तब्बल १९ दुचाकी हस्तगत केल्या.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक दुचाकींची चोरी झाली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित चित्रा चौकात चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. संशयित आसिफ बशीर पटेल (वय ३५, रा. दहिगाव, ता. यावल) याला चोरीच्या दुचाकीसह चित्रा चौकातून अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. संशयितांनी जळगाव शहर पोलीस ठाणे आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यांतर्गत चोरी केल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.
शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक रामचंद्र शिकारे, उपनिरीक्षक राजीव जाधव, साहाय्यक फौजदार सुनील पाटील, सतीश पाटील, भास्कर ठाकरे, योगेश पाटील, किशोर निकुंभ, अमोल ठाकूर, संतोष खवले, उमेश भंडारकर, पांचाळ, प्रणय पवार यांच्यासह इतरांनी ही कारवाई केली.