कॉपी पुरवणाऱ्या तिघांवर गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) : सध्या दहावी, बारावीच्या परिक्षा सुरु असून, या परीक्षांदरम्यान परीक्षा केंद्रावर कॉपी सारखे गैरप्रकार चालणार नाही. यासाठी शिक्षण विभागासह पोलिस प्रशासनाकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र, त्यातही अनेकजण कॉपी पुरविताना आढळून येतात. दरम्यान, जिल्हा पोलिस प्रशासनाकडून कॉपी पुरविणाऱ्या ७९ जणांवर आतापर्यंत कारवाई केली आहे.
कॉपीमुक्त अभियानासाठी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना कॉपी पुरविणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शनिपेठ पोलिस ठाण्यात कॉपी पुरविणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर परीक्षा केंद्राबाहेर विनाकारण फिरणाऱ्या २० ते २५ जणांना देखील पोलिसांनी ताकीद दिली आहे. कॉपी पुरवितांना कोणीही आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिला आहे.
जळगाव तालुक्यातील आसोदा येथील परीक्षा केंद्राबाहेर एका झेरॉक्सच्या दुकानावर उत्तर पत्रीकेची झेरॉक्स काढल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी गट शिक्षणाधिकारी सरला विजय पाटील यांच्या फिर्यादीवरुन प्रशांत झेरॉक्स या दुकानाच्या चालकावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत पारोळा- २५, एरंडोल १७, यावल- १५, धरणगाव- ५, भडगाव- २, चाळीसगाव ग्रामीण- २, चाळीसगाव शहर- ३, मुक्ताईनगर-३, सावदा-३, वरणगाव- १, चोपडा ग्रामीण- १, पाचोरा- २ अशा एकूण ७९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.