भडगाव पोलीस स्टेशनमध्ये दारुड्यांचा दांगडो
जळगाव (प्रतिनिधी) :- भडगाव शहरात रविवारी सार्वजनिक जागेवर भांडण करीत असलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्टेशनला आणले. मात्र पोलीस स्टेशनमध्येच या तीन मद्य पिलेल्या व्यक्तींनी गोंधळ घालत चक्क गणवेशाची कॉलर पकडत पोलिसाला कानशिलात मारली. तसेच, अश्लील शिवीगाळ करून खुर्चीची मोडतोड केली. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडगाव शहरात रविवारी दि. २९ जून रोजी संध्याकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास पाचोरा चौकात दत्त पान सेंटरजवळ काही भांडण सुरु असून गर्दी जमली असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पीएसआय सुशील सोनवणे, ग्रेड पीएसआय जगन्नाथ सोनवणे, पोहेकॉ भावेश ब्राह्मणकर, प्रवीण परदेशी, अमजद पठाण, संजय पाटील हे त्या ठिकाणी गेले.(केसीएन)तेथे मारामारी करणाऱ्या ३ इसमांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. तेथे फिर्यादी पोहेकॉ ज्ञानेश्वर नाना पाटील, पोहेकॉ विजय जाधव, मंगल गायकवाड यांनी त्यांची चौकशी केली. त्यांचे नाव विचारले असता, राजेंद्र रमेश खैरे (वय ३६), विक्की रमेश सोनवणे (वय २८), प्रतीक मार्कंड सोनवणे (वय १९, तिन्ही रा. यशवंत नगर, भडगाव) असे तिघांनी सांगितले.
तिघांच्या चौकशीत ते दारू पिलेले दिसून आले. चौकशीदरम्यान राजेंद्र खैरे याने फिर्यादी पोहेकॉ ज्ञानेश्वर पाटील यांना शिवीगाळ करून गणवेशाची कॉलर पकडून कानशिलात मारली. पोलीस कर्मचारी मंगल गायकवाड आणि विजय जाधव यांनी आवरायला गेले असता विक्की व प्रतीक याने अश्लील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत राहा म्हणून सांगितले.(केसीएन)मात्र त्यांचा गोंधळ सुरूच होता. तसेच बारनिशी कक्षात राजेंद्र खैरे याने खुर्ची जोरात आपटून मोडतोड केली. यानंतर पोलिसांनी त्यांना भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे तपासणीसाठी नेले. याबाबत फिर्याद दिल्यावरून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय सुशील सोनवणे करीत आहेत.