‘त्या’ खूनाचा ७२ तासात लागला तपास ; दोघे आरोपी गजाआड
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील सातोद शिवारात एका प्रौढाचा बोदवड रस्त्याच्या कडेला छिनविचिन्न मृतदेह आढळला होता. प्रौढाच्या खुनप्रकरणी पोलिसांनी अवघ्या ७२ तासात छडा लावून दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. केवळ १५ हजार रुपयांच्या लोभपायी प्रौढास लुटून त्यास जीवे ठार मारण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारातील मुक्ताईनगर ते बोदवड रोडच्या नाल्यात दि. ६ जून रोजी सकाळी ८ वाजता अनोळखी पुरुष जातीचे प्रेत संशयितरित्या पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सर्व अधिकारी तात्काळ मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला येऊन पथकासह घटनास्थळी रवाना झाले होते. मुक्ताईनगर ते बोदवड या सिमेंट रोडच्या डाव्या बाजूला असलेल्या नाल्यात सातोड शिवारातील सिताराम लहानु बिचकुले (रा.सातोड) यांचे शेत गट नंबर १२७ च्या समोर एक अनोळखी इसमाचे प्रेत, त्याचे डोके रक्ताने माखलेल्या स्थितीत आढळून आले. त्यावरून सदर अनोळखी व्यक्तीला कोणीतरी अज्ञात इसमाने जिवे ठार केल्याचे आढळून आले.
स्थानिक पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथील स्वतंत्र पथक तयार करून अनोळखी मयत इसमाची ओळख पटविण्याचे दृष्टीने प्रयत्न झाले. सावदा पोलीस स्टेशनचे स.पो.नि.पळे यांनी पोलीस स्टेशनला दाखल मिसिंग व्यक्तीचे नाव रवींद्र मधुकर पाटील (वय ४६ वर्षे रा. चिनावल ता. रावेर) असे असून त्याच्या उजव्या हातावर रोशनी नाव गोंदले असल्याचे सांगितले.तेव्हा मुक्ताईनगर पोलीस पथकाने मिसिंग व्यक्तीच्या नातेवाईकांना कळविले तेव्हा मयताची पत्नी नम्रता रवींद्र पाटील व भाऊ योगेश मधुकर पाटील हे मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला हजर झाले व त्यांनी मयताचे प्रेत पाहिले असता मयत हे रवींद्र पाटील असल्याची खात्री पटली.
त्यामुळे योगेश मधुकर पाटील यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे स्वतंत्र पथक रवाना झाले.
दरम्यान याच काळात पोलिसांना गुप्त बातमीदारानुसार माहिती मिळाली की, ८ रोजी दुपारी अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना मयतास ४ जून रोजी मुक्ताईनगर शहरातील संशयित राहुल संतोष काकडे व योगेश गजानन काकडे यांच्यासोबत एकत्र पाहिले असल्याची माहिती मिळाली. त्यावरून राहुल काकडे व योगेश काकडे यांचा तपास घेतला असता ते गावात आढळून आले नाही. त्यामुळे त्यांच्यावरील पोलिसांचा संशय जास्त बळावला. त्यानंतर ९ जून रोजी पोलीस स्टेशनचे पथकातील अधिकारी व कर्मचारी हे संशयित राहुल संतोष काकडे व योगेश गजानन काकडे यांचा शोध घेत असताना ते आढळून आल्याने त्यांना पोलीस स्टेशन येथे आणले व त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली.
त्यांनी गुन्हा कबुल करून सांगितले की, मयत रवींद्र पाटील यांच्याकडे १५ हजार रुपये रोख असल्याचे समजल्याने त्यांना मुक्ताईनगर ते बोदवड जाणाऱ्या रोडने एक किलोमीटर अंतरावर नेऊन त्याचे जवळील पैसे, मोबाईल व इतर वस्तू काढून त्याला दगडाने जबर मारहाण करून जिवे ठार केल्याची माहिती दिली. सदर खुनातील संशयित आरोपी राहुल संतोष काकडे (वय २५ वर्षे रा. रेणुका नगर, मुक्ताईनगर), दुसरा संशयित आरोपी योगेश गजानन काकडे (वय १९ वर्षे रा. जुने उर्दू शाळेजवळ, मुक्ताईनगर) अशा दोघांना अटक केली. पुढील गुन्ह्याचा तपास सुरू आहे.