पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव येथील एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) च्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जनावरे चोरीच्या गुन्ह्यात पकडलेले जळगांवचे दोन कुख्यात आरोपी शाकीर शाह अरमान शाह आणि अमजद शेख फकीर कुरेशी हे पोलिसांच्या ताब्यातून बेड्यांसह अमळनेरजवळून फरार झाले. याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ४ पोलिसांना निलंबित केले आहे.

ही घटना केवळ निष्काळजीपणा नसून, एलसीबीच्या सुरक्षा व्यवस्थेवरचा एक मोठा आघात आहे. एलसीबीचे पथक दोन्ही आरोपींना जळगाव येथून अमळनेरकडे घेऊन येत होते. रात्री सुमारे साडेअकरा वाजता कुऱ्हे गावाजवळ सती माता मंदिराच्या अंडरपासमध्ये वाहनाचा वेग कमी होताच, दोघांनी मागच्या सीटवरून उडी मारली. बेड्या लागलेल्या असतानाही त्यांनी अंधाराचा फायदा घेतला आणि रेल्वे रुळ ओलांडून शेतात पसार झाले. आरोपींचे बेड्यांसह पळून जाणे, पोलिसांची तयारी आणि सतर्कता यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते.
या गंभीर चुकीनंतर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी कठोर भूमिका घेत, एलसीबीच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबित झालेल्यांमध्ये संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरीलाल पाटील आणि राहुल कोळी यांचा समावेश आहे. सध्या, फरार झालेल्या दोन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठे सर्च ऑपरेशन सुरू आहे. आता प्रश्न हा आहे की, एलसीबीची पकड खरोखरच ढिली झाली आहे की, आरोपी पोलिसांपेक्षा दोन पाऊले पुढे गेले आहेत? असा सवाल जनतेमधून विचारला जात आहे.









