जळगावात अडीच लाखांचा दंड वसूल
जळगाव (प्रतिनिधी) : अल्पवयीन असताना भरधाव वेगाने दुचाकी चालविणार्या विद्यार्थ्यांवर शहर वाहतूक शाखेने कारवाई करीत तब्बल १०० दुचाकी शहर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्या. ही मोहीम कायम राहणार असून पहिल्याच दिवशी दोन लाख ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. रात्रीपर्यंत पालकांची शहर पोलिस ठाण्यानजीक गर्दी होती.
वाढते अपघात लक्षात घेता अल्पवयीन मुलांसह विना वाहनपरवाना दुचाकी चालविणार्या विद्यार्थ्यांना आळा बसावा यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सुरुवातीला शाळा, महाविद्यालय, क्लासेसला पत्र पाठवून जनजागृती केली. तरीदेखील शहरात अल्पवयीन मुले वाहने घेऊन सुसाट फिरत असल्याची बाब कायम असल्याचे दिसून आले. त्यामुळे सोमवारपासून दिनांक ९ डिसेंबर रोजी थेट दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासून कारवाई सुरू करण्यात आली.
शहरातील मू.जे. महाविद्यालय परिसरात व त्याच्या आजूबाजूला असलेल्या क्लासेस नजीक वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांनी कारवाई सुरू केली. या वेळी या एकाच परिसरात १०० अल्पवयीन दुचाकीस्वार आढळले. या सोबतच जे मुले १८ वर्षांपेक्षा अधिक आहे, मात्र त्यांच्याकडे वाहन परवाना नाही, अशांकडूनही दुचाकी जप्त करीत ती शहर वाहतूक कार्यालयात जमा करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे वाहन शहर पोलिसांनी जमा केल्याने ते सोडविण्यासाठी पालकांनी शहर वाहतूक कार्यालयात मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी मुलांचे वाहन परवान्याची मागणी केली असता पालकांनी याबाबत असमर्थता दर्शविली. रात्रीपर्यंत ही गर्दी कायम होती.
वाहन जप्त झाल्याने आता दंड भरल्याशिवाय पर्याय नसल्याने रात्रीपर्यंत २५ जणांनी दंड भरला. त्यामुळे दोन लाख ५० हजार रुपये दंड वसुली झाली. जे वाहनधारक दंड भरणार नाही, ते प्रकरणे न्यायालयात सादर केली जाणार आहे. अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्याने त्यांच्या पालकाकडून १० हजार तर १८ वर्षांवरील मात्र वाहन परवाना नसलेल्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
‘ऑन द स्पॉट’ दंड न भरल्यास न्यायालयात २५ हजार रूपये दंड पालकांना भरावे लागणार आहे. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आठ दिवसांपूर्वीच शहरातील विविध कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालयांना दुचाकी परवाना नसलेल्यांवर कारवाई केली जाईल असे पत्र दिले होते. या पत्राकडे मात्र पालकांनी दुर्लक्ष केल्याने अखेर शहर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.