१३ लाखांची रोकड हस्तगत; तीन सराईत आरोपी जेरबंद, मुख्य सूत्रधार साहिल शहा फरार
जळगाव (प्रतिनिधी) : यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खळबळजनक जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक करत त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली तब्बल १३ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार व धुळे येथील कुख्यात गुन्हेगार साहिल सत्तार शहा तसेच त्याचा साथीदार अनस शहा हे दोघे सध्या फरार असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

यावल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची चार स्वतंत्र पथके भुसावळ, यावल, चोपडा आणि जळगाव शहरात रवाना करण्यात आली. तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा चोपडा व जळगाव शहरातील टोळीने केल्याचे स्पष्ट झाले.
माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचत जुबेर खान हमीद खान (वय ३३, रा. चोपडा), शोएब शेख इस्माईल शेख (वय २५) व इस्माईल खान शेर खान (वय २५, दोघे रा. हुडको, जळगाव) यांना शिताफीने ताब्यात घेतले. सखोल चौकशीत तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या वाट्याला आलेली चोरीची १३ लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.
या गुन्ह्यात धुळे येथील सराईत व अट्टल गुन्हेगार साहिल सत्तार शहा याच्यासह अनस शहा यांचाही सहभाग निष्पन्न झाला असून, दोघेही फरार आहेत. साहिल शहा याच्यावर यापूर्वी घरफोडी, चोरी, अंमली पदार्थ तसेच वाहन चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्याच्या अटकेसाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, जितेंद्र वल्टे, शेखर डोमाळे तसेच पोलीस अंमलदार विलेश सोनवणे, प्रितमकुमार पाटील, यशवंत टहाकळे, अक्रम शेख, सलीम तडवी, छगन तायडे, बबन पाटील, मयूर निकम, राहुल रगडे, प्रदीप सपकाळे, ईश्वर पाटील, गौरव पाटील, मिलिंद जाधव तसेच चालक दर्शन ढाकणे व महेश सोमवंशी यांच्या पथकाने यशस्वीपणे केली.









