जामनेर शहरातील बोदवड चौफुली घटना
जामनेर (प्रतिनिधी) : शहरातील बोदवड चौफुली येथे अवैधरित्या मालवाहतूक वाहनातून प्राण्यांची अवैध वाहतूक करताना दोन प्रकरणांमध्ये पोलिसांनी तिघांवर कारवाई केली आहे. एका प्रकरणात १४ म्हशींना कोंबून वाहून नेताना तर दुसऱ्या प्रकरणात ४ म्हशी व एक पारडू पोलिसांनी जप्त केले आहे. जामनेर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तिघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी दोन्ही प्रकरणात जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल जगदीश भरतगीर गोसावी यांनी फिर्याद दिली आहे. जामनेर शहरातील पाचोरा रस्त्यावरील बोदवड चौफुली येथे पोलिसांनी संशयावरून दुपारी १ वाजेच्या सुमारास महिंद्रा बोलेरो मालवाहतूक थांबवली. त्यातून चार म्हशी आणि एक पारडू पोलिसांनी जप्त केले. शेख कमाल शेख सुझांन (वय २२, रा. कवठळ ता. संग्रामपूर जिल्हा बुलढाणा) याला अटक केली आहे.
दुसऱ्या घटनेत, एक टाटा कंपनीची आयशर मालवाहतूक वाहन (एम एच १८ एए ३४३५) हे थांबविले. त्यामध्ये तपासणी केली असता १४ म्हशी ह्या निर्दयतेने बांधलेल्या दिसल्या. त्यांच्याकडे डॉक्टरांचे कुठलेही प्रमाणपत्र नव्हते.
पोलिसांनी तात्काळ वाहनासह दोघा संशयीतांवर कारवाई केली आहे. यामध्ये अक्रम अमानुल्ला खान (वय ३२) व शेख मुश्ताक सत्तार शेख (वय् ४०, दोन्ही रा. सावदा ता. रावेर) असे अटक करण्यात आलेल्या दोघांचे नाव आहे. हा ट्रक सावदा येथून औरंगाबाद कडे जात होती. म्हशींना कुसुंबा येथील बाफना गो शाळेत पाठवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या आदेशानुसार पो. हे.काॅ. अनिल चाटे करीत आहे.