जळगाव शहरात स्टेट बँक कॉलनी रामानंदनगर पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील महाबळ कॉलनी परिसरातील न्यू स्टेट बँक कॉलनी येथे रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने धाड टाकून देहविक्रय व्यवसाय चालवणाऱ्या दांपत्याला आज रविवार दि. १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अटक केली आहे. यावेळी एका. २३वर्षीय पश्चिम बंगाल येथील तरुणीची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथक तयार केले. तसेच डमी ग्राहक बोलावून त्याला घटनास्थळी रवाना केले. ग्राहकाने पोलिसांना संकेत देताच त्यांनी न्यू स्टेट बँक कॉलनी येथील दोन मजली घरावर धाड टाकले. (केसीएन)या ठिकाणी संशयित आरोपी दिनेश संजय चौधरी (वय ३५, रा.दुध फेडरेशन रोड, जळगाव) आणि त्याची पत्नी यमुना राकेश प्रजापती उर्फ भारती दिनेश चौधरी (वय ४२, रा.देवेंद्र नगर,हल्ली मु. न्यू स्टेट बँक कॉलनी, जळगाव) हे दोघेजण खालच्या खोलीतील हॉलमध्ये बसलेले दिसले. तर वरच्या मजल्यावर बंद खोलीची तपासणी केली असता तेथे सदर तरुणी व डमी ग्राहक आढळून आले.
रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. तेथे संशयित आरोपी दिनेश चौधरी व त्याची पत्नी यमुना प्रजापती उर्फ भारती चौधरी यांच्यावर कुंटणखाना चालवीत असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(केसीएन)याप्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्चना घूनावत यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सचिन रणशेवरे, हेड कॉन्स्टेबल सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोना मनोज सुरवाडे, विनोद सूर्यवंशी, रेवानंद साळुंखे, योगेश बारी आदींनी कारवाई केली आहे.