अन्यथा अर्ज होणार बाद
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पोलीस भरती २०२२-२३ मध्ये एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना एक घटक अंतिम निवडून त्याबाबतचे हमीपत्र भरुन देणे आवश्यक आहे. हमीपत्र भरुन सादर न केल्यास सर्व अर्ज बाद होणार माहिती जिल्हा पोलीस दलातर्फे देण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती-२०२२-२०२३ च्या जाहिरातीमध्ये एकाच पदासाठी एकच आवेदन अर्ज करण्याबावतची अट नमूद असतांनाही काही उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करुन एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज केल्याचे निदर्शनास आले आहे. अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालयांकडून सन-२०२२-२३ च्या पोलीस शिपाई भरतीमध्ये एकाच पदासाठी विविध घटकांत एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचे नावे त्यांच्या वास्तव्याच्या जिल्हयातील पत्त्यानुसार संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांना कळविलेली आहेत.
त्याअनुषंगाने जळगांव जिल्हात वास्तव्यास असलेल्या ज्या उमेदवारांनी एकाच पदासाठी एका पेक्षा अधिक घटकात आवेदन अर्ज सादर केले आहेत. अशा उमेदवारांच्या नावांची यादी जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास प्राप्त झालेली आहे. सदरहू उमेदवारांना महाराष्ट्र पोलीस भरती-२०२२-२३ च्या अनुषंगाने ऑनलाईन आवेदन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविणा-यां यंत्रणेकडून त्यांनी आवेदन अर्ज भरतांना नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेश देखील देण्यात आलेले आहेत.
जळगांव जिल्हयातील ज्या उमेदवारांनी एकापेक्षा अधिक घटकात आवेदन अर्ज सादर केलेले आहेत. अशा उमेदवारांनी दि. १७ मे रोजी पर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालय येथे स्वतः मुळ आधारकार्ड व आवेदन अर्जाची प्रतीसोबत घेऊन उपस्थित राहुन एका पदासाठी एकच घटकासाठी आवेदन अर्ज पोलीस भरती-२०२२-२३ साठी ग्राह्य धरण्याबाबतचे हमीपत्र भरुन द्यावे. ज्या उमेदवारांनी एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केले आहेत. अशा उमेदवारांनी हमीपत्र भरुन सादर न केल्यास त्यांचे सर्व अर्ज बाद करण्यात येतील याबाबत अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयांकडून सर्व पोलीस घटक कार्यालयांना सूचीत केलेले आहे. याबाबत संबधित उमेदवारांना देखील भ्रमणध्वनी व इमेल द्वारे कळविण्यात आले आहे.