जामनेर ( प्रतिनिधी ) – आज प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर शहरातील पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचे उदघाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आणि आमदार गिरीश महाजन व नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .
पोलीस ठाण्याची ही नवी इमारत वर्षभरापासून उदघाटनाची प्रतीक्षेत होती . पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे , चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , पाचोरा उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक भारत काकडे , जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते . या उदघाटन सोहळ्यानंतर राजकीय मुद्द्यांवर बोलण्याचे पालकमंत्र्यांनी जाणीवपूर्वक टाळले .
या नव्या इमारतीत फर्निचरच्या व्यवस्थेसाठी शक्य तेवढ्या लवकर निधी मंजूर करावा या आमदार गिरीश महाजन यांच्या मागणीला तात्काळ होकार देत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून यासाठी तरतूद करू , असे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले . जामनेरातील पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न सुटावा म्हणून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवून तो मंजूर करून घेण्याचे आणि पोलिसांना जिल्हाभरात पुरेशी वाहने उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले .