‘कागदोपत्रीच’ तपास कामी पाठवल्याचा निरीक्षकांचा दावा
एलसीबीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह ?
जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यात गुरे चोरणारे जळगांवचे आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्याप्रकरणी निलंबित झालेले स्थानिक गुन्हे शाखेचे चार पोलीस कर्मचारी निलंबित असून त्यांना निलंबनानंतर पोलीस मुख्यालयात जमा करण्याऐवजी ते आजही स्थानिक गुन्हे शाखेतच कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, फरार आरोपींपैकी एक आरोपी अटकेत असून दुसऱ्याच्या शोधार्थ या चौघांना पाठविण्यात आल्याची माहिती निरीक्षकांनी दिली.
गुरे चोरीच्या घटनेतील दोन संशयित, शाकीर शहा अरमान शाह (वय ३०) आणि अमजद शेख फकिर कुरेशी (वय ३५), हे अमळनेर येथे आणत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यातून फरार झाले होते. या निष्काळजीपणामुळे, पोलीस अधीक्षकांनी पोहेकॉ संदीप पाटील, हरिलाल पाटील, प्रवीण माडोळे व पो.कॉ. राहुल कोळी या चौघांना निलंबित केले होते. निलंबित केल्यानंतर या कर्मचाऱ्यांना पोलीस मुख्यालयात जमा करणे आणि त्यांना कोणत्याही महत्त्वाच्या तपासापासून दूर ठेवणे अपेक्षित असते.
मात्र, दोन्ही फरार आरोपींच्या तपास कामी चौघांची नियुक्ती केलेली आहे. आठ दिवसापासून ते तपासकामी बाहेर आहे. ते आल्यावर त्यांना निलंबनाची ऑर्डर दिली जाणार आहे. अशी माहिती निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दिली आहे. यातील एक फरार आरोपी अमजद कुरेशी याला दिल्लीवरून अटक करून अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर दुसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा तपास सुरू आहे.









