जळगाव शहरात चार दिवसांपूर्वी घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दोन दिवस अगोदर १८ नोव्हेंबर रोजी अपक्ष उमेदवार तथा एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन यांच्या घरावर पहाटे ४ वाजता गोळीबार झाला होता. या प्रकरणी दोन संशयितांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेने तपास सुरू केला आहे. संशयितांना शोधण्यासाठी चार पथके नियुक्त केली आहेत. मात्र सध्या एलसीबीच्या पथकांना अपयश आले आहे.
शेख अहमद हुसेन राहत असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीवर सोमवारी पहाटे चार वाजता दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी तीन बंदुकीतून तीन राऊंड फायर केले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. निवडणुकीच्या बंदोबस्तात पोलिस यंत्रणा व्यग्र असल्याने गेल्या तीन दिवसांत या प्रकरणी कुठलाही तपास करण्यात आला नाही. गुरुवारी मतदान झाल्याने पुन्हा या गुन्ह्याचा तपास एलसीबीने सुरू केला आहे.
यापूर्वी सोमवारीच सीसीटीव्ही फुटेजवरून हल्ल्यांतील संशयितांच्या वाहनाचे लोकेशन संभाजीनगर रस्त्यावरील कुसुंब्याजवळ दिसत आहे. गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलिसांकडे असताना एमआयडीसी व एलसीबी अशी दोन पथक याचा तपास करत होते. तपास वर्ग झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांची संख्या वाढवून चार करण्यात आली आहे.
आतापर्यंत पोलिसांनी आज बाजूचे असे मिळून ४० ते ५० सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अद्यापही ठोस अशी माहिती एलसीबीकडे मिळालेली नाही. त्यामुळे नेहमी वेगवान असणारी एलसीबी या प्रकरणात थंडावली आहे.