जळगाव शहरात गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) :- पोकलॅण्ड मशीन विक्री करून देतो असे सांगून परस्पर २० लाखांमध्ये दुसऱ्यालाच पोकलॅण्ड मशिन विक्री करून वाघ नगरातील तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार ७ ऑक्टोबर रोजी उघडकीला आला आहे. याप्रकरणी रविवारी २७ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पुण्यातील एकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाधान प्रदीप वाघ (वय ३७ रा. वाघ नगर, जळगाव) हा तरूण खासगी व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो. समाधान वाघ याची रोहीत मारूती चासकर रा.पुणे यांच्याशी ओळख आहे. समाधान यांच्याकडे पोकलॅण्ड मशीन आहे. रोहित चासकर याने त्यांचे पोकलॅण्ड विक्री करून देतो असे सांगून मशीन पुण्याला घेवून गेला. तिथे समाधान वाघ याला काहीही न सांगता २० लाखात परस्पर विक्री केले. ही बाब समाधान वाघ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी रोहित चासकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ हे करीत आहे.