जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- मेहरुण तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या शाहू नगर परिसरातील १३ वर्षीय चार मुले पाण्यात बुडून गडांगळ्या खाऊ लागले. त्या वेळी आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने तीन जणांना वाचविण्यात यश आले. मात्र ११ वर्षीय बालकाला वाचविण्यात अपयश आले असून त्याचा मृत्यू झाला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
ईशान शेख वसीम (१३, रा. शाहू नगर) असे मयत बालकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरात घडली. शाहू नगर परिसरात राहणारे ईशान शेख, मोईन खान अमीन खान (१३), अयान तस्लीम भिस्ती (१३) व असलम शेख सलाउद्दीन (१३) सर्व रा. शाहूनगर, जळगाव हे चौघे जण शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरात पोहण्यासाठी गेले. चौघेही पाण्यात उतरले व काही वेळातच ते गटांगळ्या खाऊ लागले. हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आला. त्या वेळी ते मदतीसाठी धावले.
यातील मोईन खान, अयान भिस्ती व असलम शेख हे तिघे जण लवकर हाती लागले. त्यांना बाहेर काढून त्यांच्या पोटातून पाणी काढण्यात आले. त्यानंतर ईशान सापडला. चौघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ईशान याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चारही मुलांचे नातेवाईक व परिसरातील नागरिक मेहरुण तलाव परिसर व रुग्णलयात पोहचले होते. त्यामुळे दोन्ही ठिकाणी गर्दी झाली होती.
ईशानच्या मृत्यूची वार्ता समजताच नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी व रुग्णालयात पोहचले.
मयत ईशानचे वडील पेंटर असून आई गृहिणी आहे. शेख दाम्पत्याला दोन मुली असून ईशान हा एकुलता एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा व बहिणींचा लाडका भाऊ गेल्याने शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.