जामनेर तालुक्यातील टाकळी गावाजवळची घटना
राहूल रामदास सुरसे (वय-३० रा. चिखली ता. बुलढाणा) आणि सुनिल सुरेश पवार (वय ३५, रा.धोबीवराड ता.जळगाव) असे मयत झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांची नावे आहेत. सुनिल पवार हा कुटुंबासह शनिवारी १० मे रोजी बोदवड तालुक्यातील एका गावात नातेवाईकांकडे लग्नासाठी गेला होता.(केसीएन)लग्न आटोपल्यानंतर दुपारी ४ वाजता सुनिल पवार हा मुलगा कार्तीक सुनिल पवार (वय-६) आणि पिया सुनिल पवार (वय-८) या दोघा मुलांना सोबत घेवून बोदवड-जामनेर रस्त्याने वराड गावाकडे दुचाकीने निघाला होता. रस्त्यावरील टाकळी गावाजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत सुनिल पवार आणि राहूल सुरशे हे जागीच ठार झाले तर सुनिलची दोन्ही मुले कार्तीक पवार आणि पिया पवार हे जखमी झाले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर रस्त्यावरील वाहनचालकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह आणि दोन्ही जखमी मुलांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मयतांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मन हेलावणारा आक्रोश केला.(केसीएन)याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक फौजदार संजय महाजन आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश माळी हे करीत आहे.