भुसावळ सत्र न्यायालयाचा निर्णय
भुसावळ ( प्रतिनिधी ) – रावेर तालुक्यातील पाल शिवारातील शेत गट नंबर २७१ मध्ये २९ नोव्हेंबर २०२१ रोजी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, उडीदाची दाळीची भाजी खाण्याचे म्हटल्याच्या रागावरून झालेल्या किरकोळ वादातून मुलाने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी भुसावळ जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी दिनेश उर्फ शिवा अनाज्या बारेला याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या खटल्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) आणि ३२३ ( प्राणघातक हल्ला) अंतर्गत दोष सिद्ध झाल्याने हा निकाल देण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा अंतिम निकाल दिला असून, सहाय्यक सरकारी वकील मोहन देशपांडे यांनी यशस्वीपणे बाजू मांडली. तपासात पैरवी अधिकारी पो. कॉ. कांतीलाल कोळी, ज्ञानेश्वर चौधरी आणि हेमराज झटके यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ही घटना पाल शिवारातील शेत गट नंबर २७१ मध्ये, पुनमचंद मांगो पवार यांच्या शेतात घडली. फिर्यादी बनाबाई नरसिंग बारेला (वय ३२, व्यवसाय: मजुरी) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार त्या आणि त्यांचे पती नरसिंग बारेला हे गेल्या एका वर्षापासून पुनमचंद पवार यांच्या शेतात राहत होते आणि शेतजमीन निम्म्या हिश्श्याने कसत होते. त्यांच्या शेजारी बनाबाई यांचे आई-वडील गीताबाई आणि अनाज्या बारेला राहत होते.
बनाबाई यांचे तीन भाऊ असून, त्यापैकी मोठे भाऊ अंगारसिंग आणि सुनिल हे उस तोडणीच्या कामासाठी बाहेरगावी गेले होते. तिसरा भाऊ दिनेश उर्फ शिवा (आरोपी) हा त्याच्या तीन मुलांसह शेजारी राहत होता. दिनेश हा कोणतेही कामधंदे करत नव्हता आणि त्याने दोन-तीन वर्षांपूर्वी त्याची पत्नी गुड्डी हिला मारहाण करून माहेरी हाकलले होते.
दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दिनेश घरी आला. त्याने वडील अनाज्या यांना जेवणात काय आहे, असे विचारले. अनाज्या यांनी उडीद दाळीची भाजी केल्याचे सांगितले. यावरून दिनेशला राग अनावर झाला आणि त्याने वडिलांना शिवीगाळ करत चापटांनी मारहाण सुरू केली. बनाबाई यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता, दिनेशने त्यांनाही चापटांनी आणि बुक्यांनी मारहाण केली. घाबरलेल्या बनाबाई तिथून पळून गेल्या, तसेच अनाज्या यांनीही पळ काढला. मात्र, दिनेशने हातात लाकडी खाटेचा माचा घेऊन वडिलांचा पाठलाग केला. तुरीच्या शेतात त्याने अनाज्या यांच्या डोक्यावर लाकडी माच्याने जोरदार वार केले, ज्यामुळे अनाज्या खाली पडले.
त्यानंतरही दिनेशने त्यांच्या डोक्यावर वार करत मारहाण सुरूच ठेवली. यात अनाज्या यांचे डोके फुटून ते जागीच मृत्यू पावले. प्रत्यक्षदर्शी आणि साक्षीदार बनाबाई यांनी आरडाओरड केल्याने शेजारी राहणारे नजरसिंग रेमसिंग बारेला आणि त्यांची आई गीताबाई घटनास्थळी धावून आले. मात्र, तोपर्यंत दिनेश अनाज्या यांना ठार मारून पळून गेला होता. शेजारच्या शेतात काम करणाऱ्या विक्रम बंजारा (रा. गुलाबवाडी) यांनी पोलिसांना फोन करून खुनाची माहिती दिली. या खटल्यात एकूण १६ साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला. यामध्ये फिर्यादी बनाबाई नरसिंग बारेला, त्यांची आई गीताबाई, शेतमालक पुनमचंद मांगो पवार, नजरसिंग रेमसिंग बारेला, विक्रम मुसा राठोड, शंकर किसान भाई, तपास अधिकारी सचिन बाळासाहेब नवद, पोस्टमॉर्टम करणारे डॉ. अनिकेत महेंद्र चव्हाण आणि इतरांचा समावेश होता. विशेषतः बहिण बनाबाई यांनी “हा तोच खाटेचा माचा आहे” अशी दिलेली साक्ष हा या खटल्यातील महत्त्वाचा पुरावा ठरला.
घटनास्थळाचा पंचनामा विनोदसिंग व्यंकटसिंग राजपुत यांनी केला, तर हत्याराचा निरीक्षण पंचनामा सुरेश विलास बागडे यांनी केला. तपास अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांनी सखोल तपास करून खटल्याची पडताळणी केली. गोकुळ प्रकाश चौधरी हे पंच म्हणून उपस्थित होते. हत्यार आणि इतर पुराव्यांचा तपास काळजीपूर्वक करण्यात आला, ज्यामुळे आरोपीविरुद्ध ठोस पुरावे गोळा झाले. भुसावळ जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली. सहाय्यक सरकारी वकील मोहन देशपांडे यांनी फिर्यादी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. आरोपी दिनेश उर्फ शिवा याच्याविरुद्ध कलम ३०२ आणि ३२३ अंतर्गत दोष सिद्ध झाले. बनाबाई यांनी ओळखलेला लाकडी खाटेचा मचा हा पुरावा निर्णायक ठरला. या आधारावर न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.