जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे सुरू
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे गावठी कट्टा (पिस्तूल) हाताळताना एक तरुण गोळी सुटल्याने व ती पोटात गेल्याने गुरुवारी दि. २१ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान सुरुवातीला अपघाताचा बनाव करून शासकीय रुग्णालयात तरुणाला दाखल करण्यात आले होते. मात्र गोपनीय माहितीवरून पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आता गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली प्र.न. येथे संशयित आरोपी भुरा उर्फ चुडामण भिल्ल आणि दिनकर दयाराम मोरे (वय ५०) हे दोघे गुरुवारी दि. २१ रोजी दुपारी दीड वाजता भूरा भिल्ल याच्या सासूच्या घराजवळ उभे होते. (केसीएन) त्यावेळेला भुरा भिल्ल याने त्याच्याकडील गावठी कट्टा बाहेर काढला. हा कट्टा दिनकर मोरे ( रा. दापोरा) हा हातात घेऊन पाहू लागला. कट्टा पाहत असताना अचानक त्याच्यातून गोळी सुटली व ती दिनकर मोरे यांच्या पोटात लागली त्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र भुरा भिल्ल आणि त्याच्या नातेवाईकांनी दिनकर मोरे याला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
तेथे, त्याचा अपघात झाला असून पोटामध्ये खडे गेले आहे असा बनाव करीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना खोटे सांगितले. (केसीएन)मात्र रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशनला गोपनीय माहितीवरून घटना कळताच त्यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेऊन माहिती जाणून घेतली. तसेच संशयित आरोपी भुरा उर्फ चुडामण भिल्ल याला ताब्यात घेतले आहे.
त्याच्याकडून गावठी कट्टा देखील हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, दिनकर मोरे यांच्यातर्फे तक्रार देण्यास नकार देण्यात आल्याने अखेर शासनातर्फे पोलीस कॉन्स्टेबल यांच्याकडून फिर्याद देण्याचे काम सुरू असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. सदर या प्रकरणात भुरा उर्फ चुडामण शिरसोली प्र.न. व जितु कोळी (रा.शिवाजी नगर जळगाव) यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असुन यासंदर्भातील सखोल चौकशी सुरू आहे.दरम्यान दिनकर दयाराम मोरे याच्यावर शासकीय रुग्णालयात पोटातील बंदुकीची गोळी काढून त्याच्यावर शस्रक्रिया करण्यात आली आहे. व तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.
दरम्यान गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.