जळगाव शहरात रामानंदनगर पोलिसांची धडक कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गावठी बंदूक घेऊन पिंप्राळा परिसरात दहशत माजवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले होते. याच सूचनांनुसार, रामानंद नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पिंप्राळा परिसरातील सराईत गुन्हेगार महेंद्र उर्फ दादू सपकाळे हा हुडको परिसरात गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत आहे. त्याच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांनी आपली दुकाने बंद केली होती.
या माहितीच्या आधारे, पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने पिंप्राळा हुडको परिसरात महेंद्रचा शोध सुरू केला. पोलिसांची चाहूल लागताच महेंद्र पिंप्राळा रोडकडे पळू लागला. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस पथकाने त्याचा पाठलाग केला. तो खंडेराव नगरकडे पळत असताना पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.त्याच्या झडतीमध्ये २०,००० रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस सापडले. पोलिसांनी ते जप्त केले आहे. आरोपी महेंद्र उर्फ दादू सपकाळे याच्यावर यापूर्वी रामानंद नगर पोलिस ठाण्यात एकूण ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोउपनि सचिन रणशेवरे, पोहेका जितेंद्र राजपुत, सुधाकर अंभोरे, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोना हेमंत कळसकर, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, योगेश बारी, विनोद सुर्यवंशी आणि गोविंदा पाटील यांचा सहभाग होता. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि सचिन रणशेवरे करत आहेत.









