जळगावच्या माहेरवाशिणीची भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार
भुसावळ (प्रतिनिधी) :- पहिले लग्न झालेले असतानाही आपण घटस्फोटीत असल्याचे भासवून २९ वर्षीय महिलेशी दुसरे लग्न केले. लग्नानंतर झालेला मुलगा दत्तक देण्यासाठीच्या आग्रहात विवाहितेचा छळ केला व दागिने हडप केले. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावच्या कांचन नगरमधील रहिवासी २९ वर्षीय विवाहितेने, तिच्यावर छळ केल्याचा आरोप केला असून संशयित शरद छगन सैंदाणे, छगन महादू सैंदाणे, आशा हर्षल सैंदाणे (सर्व रा. नादेड ता. धरणगाव), सुनील सोनवणे, रेखा सुनील सोनवणे, मयूर सुनील सोनवणे (सर्व रा.जामनेर), सचिन सैंदाणे (रा. नांदेड ता. धरणगाव हल्ली मुक्काम पुणे) यांनी हा छळ व गुन्हा केला असल्याचे महिलेने म्हटले आहे.
संशयित शरद सैंदाणे याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला नसताना देखील तसे विवाहितेला भासवून दुसरे लग्न केले. विवाहितेला झालेले मुल हे आशा सैंदाणे यांना दत्तक देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. शिवीगाळ करून मारहाण केली आणि अंगावरील दागिने देखील काढून घेतले. विवाहितेला तिला माहेरी सोडून देत तिची फसवणूक केली म्हणून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड हे स्वतः करीत आहेत.