नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) – कोरोना रोखण्यासाठी आता फायझर कंपनीने पॅक्सलोविड ही विषाणू प्रतिबंधक गोळी तयार केली आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणे किंवा मृत्यूचे प्रमाण ८९ टक्क्यांनी कमी होऊ शकणार आहे .
ऑस्ट्रेलियातील औषध नियामक संस्था या गोळीची परिणामकारकता व सुरक्षितता तपासून बघणार आहेत. आधी कोरोनावर जी औषधे वापरण्यात आली ती प्रत्यक्षात कोरोनावरची नव्हती अन्य विषाणूजन्य रोगांवर वापरली जाणारी होती. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील जे लोक रुग्णालयात दाखल होण्याच्या स्थितीत होते, त्यांच्यावर या गोळीच्या करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष तपासून पाहण्यात येत आहेत.
पॅक्सलोव्हिड हे दोन एचआयव्ही औषधांचे मिश्रण असून त्यात रिटोनावीर व पीएफ ०७३२१३३२ या प्रायोगिक गोळीचा समावेश आहे. रिटोनावीर हे औषध पीएफ ०७३२१३३२ या प्रायोगिक गोळीचे कार्य नियंत्रित करते. ते औषध विघटित न होता थेट विषाणूपर्यंत पोहोचणे आवश्यक असते. १२१९ रुग्णांवर या औषधाचे प्रयोग करण्यात आले आहेत. ८९ टक्के लोकांना फायदा झाल्याचे दिसून आले आहे. पॅक्सलोव्हिड गोळी दिल्यानंतर २६ दिवसांनी एकही मृत्यू झाल्याचे आढळून आले नाही.