जळगाव शहरातील मेहरूण भागातील घटना
संजय नामदेव ढेकळे (वय ५४, रा.आदर्शनगर) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ढेकळे त्यांच्या चारचाकी वाहनात, डिझेल भरण्यासाठी मेहरुणजवळील एका पेट्रोल पंपावर गेले होते. त्याचवेळी सावरीया हॉटेलकडून दोन मोटारसायकलवर शुभम सुनील शिंदे, शरद अशोक पाटील, कुणाल पाटील आणि शेखर (पुर्ण नाव माहिती नाही) हे चौघेजण आले. या चौघांनी ढेकळे यांना पेट्रोल पंपाचा मालक समजून ‘तुमच्याजवळ स्पीड पेट्रोल का नाही?’ असे विचारत त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
हा वाद वाढल्यानंतर चौघांनी ढेकळे यांना शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि दमदाटी केली. यावेळी शरद पाटील याने त्याच्या हातातील लोखंडी कड्याने ढेकळे यांच्या कपाळावर मारून त्यांना दुखापत केली. या घटनेनंतर ढेकळे यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.