जळगाव तालुक्यातील रोहनवाडी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहरापासून जवळ असलेल्या आव्हाणे शिवारातील रोहनवाडी येथे नातीला शिकवणाऱ्या मॅडमचा पत्ता दिला नाही या कारणावरून एका महिलेसह तिच्या नातीला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. तसेच, त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन तोडून नुकसान केल्याचा प्रकार शनिवारी, २४ मे रोजी सकाळी ११ वाजता घडला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ४ महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहनवाडी येथे राहणाऱ्या सुनंदा आनंद निकम (वय ५७) यांच्याकडे मंगल मुरलीधर सुरवाडे, अश्विनी शालिक सुरवाडे, गीता धनराज वाघ आणि सरिता संजय दांडगे (सर्व रा. महादेव नगर, जळगाव) या महिला आल्या होत्या. त्यांना सुनंदा निकम यांच्या नातीला शिकवणाऱ्या पाटील मॅडमचा पत्ता हवा होता. मात्र, सुनंदा निकम यांनी पत्ता देण्यास नकार दिला. याच रागातून चौघींनी मिळून सुनंदा निकम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आजीला मारू नका असे बोलल्याने त्यांची नात वंक्षिका हिलाही महिलांनी मारहाण केली. या झटापटीत सुनंदा निकम यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि नाकातील नथ तोडून नुकसान करण्यात आले. या घटनेनंतर सुनंदा निकम यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चारही महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र तायडे करत आहेत.