अमळनेर न्यायालयाचा निर्णय
अमळनेर (प्रतिनिधी) :- पत्नीवरून झालेल्या भांडणात मित्राला कमरेच्या पट्याने गळा आवळत गुप्तांगावर मारहाण करून मित्राची हत्या करणाऱ्या एकाला अमळनेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी चोपडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता.
लहू अशोक भिल (वय २९, रा.अकुलखेडे ता.चोपडा) असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. लहू भिल हा २ ऑक्टोबर २०२२ रोजी मित्र दिनेश वेरसिंग सस्ते यांच्या सोबत अकुलखेडे येथील पाटचारी जवळ असलेल्या लोखंडी पुलाजवळ दारू प्यायला बसले. त्याचवेळी दोघांमध्ये लहूच्या पत्नीवरून भांडण झाले. त्यानंतर दोघांमध्ये मारामारी झाली. यात लहू भिल याने त्याच्या कमरेला लावलेल्या पट्ट्याने मयताचा गळा आवळला व पायात घातलेल्या बुटाने गुप्तांगावर लाथ मारली. त्याला जखमी अवस्थेत सोडून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
यात जखमी अवस्थेत पडलेल्या दिनेश सस्ते याचा मृत्यू झाला होता.याबाबत मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक अवतारसिंग चव्हाण व पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत यांनी घटनेचा तपास केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या जवाबावरून विचारपूस केली असता संशयित लहू भिल याने गुन्ह्याची कबुली दिली होती. सदर खटल्यात १२ साक्षीदार तपासण्यात आले.त्यात फिर्यादी दिलीप वेरसिंग सस्ते, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मुन्ना रविंद्र पवार, डॉ. चंद्रहास पाटील तपासणी अधिकारी यांची साक्षी घेण्यात आल्या होत्या.त्यात मुन्ना पवार व डॉ.चंद्रहास पाटील यांची साक्ष महत्वाची ठरवत जिल्हा न्यायाधीश २ पी आर चौधरी यांनी लहू भिल याला जन्मठेपेची शिक्षा व ५०० रुपये दंड, व दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील आर बी चौधरी यांनी युक्तिवाद केला. तर पैरवी अधिकारी उदयसिंग साळुंखे, पोलीस नाईक हिरालाल पाटील, नितीन पाटील, राहुल रणधीर व अतुल पाटील यांनी काम पाहिले.