भुसावळ शहरातील घटना, गुन्हा दाखल
भुसावळ ( प्रतिनिधी ) – घरगुती वादातून निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना १९ पोलीस ऑगस्ट रोजी रात्री उघडकीस आली आहे. या प्रकरणी जखमी कर्मचाऱ्याची पत्नी, मुलगी आणि इतर तिघांसह एकूण पाच जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
निवृत्त रेल्वे पोलिस हेकॉ. सुभाष शंकरराव चिखलकर (६८, रा. विघ्नहर्ता कॉलनी) यांच्यावर
१९ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या पत्नी संगीता आणि मुलगी नेहा यांच्यासोबत घरी होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे संतोष सुखदेव अटवेकर आणि त्याची आई सखुबाई अटवेकर घरी आले. घरात प्रवेश करण्यास चिखलकर यांनी विरोध केल्यानंतर वाद निर्माण झाला. संतोष अटवेकरने ‘हे घर नेहाचे आहे, तुला राहण्याचा अधिकार नाही,’ असे म्हणत चिखलकर यांना शिवीगाळ केली आणि त्यानंतर संतोष, सखुबाई, संगीता व नेहाने मिळून घरात पडलेल्या काठ्यांनी चिखलकर यांच्यावर हल्ला केला.
संगीताने नेहाला तलवार आणण्यास सांगून हल्ल्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता, संतोष आणि संगीताने चिखलकर यांचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. घराबाहेर उभ्या असलेल्या गजानन व्यंकटेशन गुरुशेट्टी याला ‘सुभाषला पकडून मार,’ असे सांगण्यात आले. त्यानेही चिखलकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुभाष चिखलकर यांनी प्रसंगावधान राखत तिथून सुटका करून घेतली आणि आपल्या पहिल्या पत्नी मंगला यांच्याकडे दत्तनगर येथे पोहोचले. त्यानंतर, त्यांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात पत्नी संगीता, मुलगी नेहा, संतोष अटवेकर, सखुबाई अटवेकर आणि गजानन गुरुशेट्टी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.